दुलीप ट्रॉफीवर हिंदुस्थान ‘अ’ची मोहोर, हिंदुस्थान ‘क’ चा उडवला 132 धावांनी धुव्वा

हिंदुस्थान अचे 350 धावांचे आव्हान हिंदुस्थान ‘क’ संघाला पेलवलेच नाही. साई सुदर्शनच्या 111 धावांच्या झुंजार खेळीला अन्य पुणाचीही साथ न लाभल्यामुळे हिंदुस्थान ‘क’ चा दुसरा डाव  217 धावांवरच गुंडाळण्यात प्रसिध पृष्णा-तनुष कोटियन यांना यश लाभले आणि हिंदुस्थान ‘अ’ ने गुणतालिकेत 12 गुणांसह अव्वल स्थान पटकावत दुलीप ट्रॉफीवरही आपली मोहोर उमटवली. तसेच दुसऱ्या सामन्यात स्पर्धेबाहेर फेकल्या गेलेल्या हिंदुस्थान ‘ड’ संघाच्या अर्शदीप सिंह आणि आदित्य ठाकरे यांनी अवघ्या 22.2 षटके गोलंदाजी करत 115 धावांत हिंदुस्थान ‘ब’चा खुर्दा पाडला आणि शेवट गोड करणारा विजय मिळवला.

साईची झुंजार खेळी

हिंदुस्थान ‘अ’ने आपला डाव 8 बाद 286 धावांवर आपला डाव घोषित करत ‘क’ संघाला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागी रचत सामन्यात चुरस निर्माण केली होती. मात्र ही जोडी फुटल्यानंतर एकदा साई संघाच्या विजयासाठी प्रतिस्पर्धी गोलंदाजांशी भिडला, पण त्याला एकाही फलंदाजाची साथ न लाभल्यामुळे त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे शेवटचे सहा फलंदाज दोन अंकी धावासुद्धा करू शकले नाहीत. 111 धावांवर साई बाद झाल्यावर अवघ्या एका धावेत शेवटचे दोन्ही फलंदाजही बाद झाले आणि त्यांचा डाव 217 धावांवर कोलमडला.

अर्शदीप-आदित्यची कमाल

रिकी भुईच्या 119 धावांच्या खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘ड’ ने दुसऱ्या डावात 305 अशी दमदार मजल मारली आणि हिंदुस्थान ‘ब’ समोर विजयासाठी 373 धावांचे जबर आव्हान ठेवले, मात्र ‘ड’ च्या आव्हानाला ‘ब’ संघाचे खेळाडू उत्तरच देऊ शकले नाही. मुशीर खान, सूर्यपुमार यादव, अभिमन्यू ईश्वरनसारखे खेळाडू लवकर बाद करत ‘ड’ संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. अर्शदीप आणि आदित्य सलग 23 षटके गोलंदाजी करत 115 धावांतच हिंदुस्थान ‘ब’चा संघ गारद केला. अर्शदीपने भन्नाट मारा करत 40 धावांत 6 विकेट टिपले तर आदित्य ठाकरेने 59 धावांत 4 फलंदाज बाद केले. या विजयामुळे ‘ब’ चे जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले.