कमजोर विचारधारेमुळे अनेकजण संकटात पळ काढतात, मल्लिकार्जुन खरगे यांचा पक्षबदलूंना टोला

घाईघाईत आपण पक्षात अनेकांना सामावून घेतो. परंतु, कमजोर विचाधारेमुळे असे लोक संकटाच्या वेळी पळ काढतात, असा सणसणीत टोला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पक्षबदलू नेत्यांना, कार्यकर्त्यांना लगावला. तसेच असल फिसल पडे और नकल चल पडे या म्हणीची आठवणही करून दिली. भविष्यातील निवडणुक निकालांसाठी पक्षातील नेतेच उत्तरदायी असतील, असा इशाराही त्यांनी दिला. आज दिल्लीतील इंदिरा भवनमध्ये पक्षकार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

पक्षात काही बदल झालेत, आणखी काही बदल होणार आहेत, असे संकेतही त्यांनी दिले. पक्षातील नेत्यांनी जमिनीवर राहून, लोकांमध्ये मिसळून आणि बुथस्तरावर पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

मतदार याद्यांमधील घोटाळा थांबवा

सध्या मतदार याद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घोटाळा सुरू आहे. लोकसभेत राहुल गांधींनीही याबाबत सवाल उपस्थित केला होता. आपल्या समर्थकांची नावे मतदार याद्यांमधून गायब केली जात आहेत. त्यांना हटवून दुसऱया मतदान केंद्रात त्यांचा समावेश केला जात आहे. निवडणुकांच्या ठीक आधी हे सर्व केले जाते. भाजपाकडून हा सर्व घोटाळा सुरू आहे. हे सर्व थांबवायला पाहिजे असेही खरगे म्हणाले.