शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत पाळीव श्वानांची संख्या वाढत असल्यामुळे महापालिकेने पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात 65 गुंठ्यांत सर्व सुविधा असलेले शहरातील पहिलेच ‘डॉग पार्क’ तयार केले आहे. या ‘डॉग पार्क’ला शहरातील विविध भागातील श्वानप्रेमी नागरिकांना चांगलीच भुरळ पडली आहे.
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने दीड हजार श्वान परवाने वितरित केले. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नवी सांगवी, रहाटणी, पिंपळे गुरव, रावेत या भागात श्वान परवानाधारकांची सर्वाधिक संख्या आहे. श्वान परवाना घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. शहरातील श्वानप्रेमी नागरिक रस्त्यावर आणि फुटपाथवर श्वानांना फिरवत असतात. त्यामुळे अनेक भागात अस्वच्छता होते. त्या श्वानांना स्वतंत्र पार्क असावे, तेथे श्वानांना खेळण्यास जागा असावी, अशी मागणी श्वानप्रेमी नागरिक करीत होते. त्यानुसार महापालिकेने पिंपळे सौदागर येथे स्वराज चौक, गोविंद गार्डनजवळ ‘डॉग पार्क’ विकसित केले आहे. मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी महापालिकेने हे ‘डॉग पार्क’ उभारले आहे. यात पाळीव श्वानांना मनोरंजन व खेळण्याची व्यवस्था केली आहे.
डॉग पार्क ‘मधील सुविधा
पिंपळे सौदागरमधील डॉग पार्कमधील श्वानांना सुविधा तयार करण्यात आल्या ‘ आहेत. यामध्ये 2 फूट उंच दगडी भिंतीवर बाह्य कुंपण 5 फूट उंच आहे, वेगवेगळ्या कुत्र्यांसाठी वेगवेगळी खेळण्यासाठी लॉन, श्वानांना फिरण्यास फुटपाथ, मोकळे खेळण्यास डॉग माऊन्ड, सेलिब्रिशन पॉईन्ट, डॉग कॅफे, पिण्याच्या पाण्याची सोय, मालकांसाठी विश्रांती कक्ष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेने गोविंद चौकात केलेल्या ‘डॉग पार्क’ला श्वानप्रेमी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन सत्रांमध्ये सरासरी 25 ते 30 श्वानमालक ‘डॉग पार्क’ला भेट देतात. शनिवारी व रविवारी संख्या अधिक असून, सरासरी 100 श्वान मालक ‘डॉग पार्क’ला भेट देतात. या पार्कसाठी पशुवैद्यकीय विभागामार्फत कर्मचारी नियुक्त करून ‘डॉग पार्क’ मधील देखभाल व साफसफाईचे कामकाज करण्यात येत आहे. तसेच ‘डॉग पार्क’ हे पिंपरी-चिंचवडमधील पहिलेच, तर राज्यातील दुसरे आहे. यापूर्वी फक्त मुंबई महापालिकेने ‘डॉग पार्क’ उभारले आहे. शहरातील ‘डॉग पार्क’मुळे श्वानप्रेमी नागरिकांना त्यांच्या श्वानांसाठी हक्काचे ठिकाण झाले आहे.