
एक आठवड्याने श्रावण सुरू होतोय. त्यामुळे आठवडाभर ताटात मासे, चिकन आणि मटण दिसेल. पण मासेमारी बंद असल्याने आणि बाजारात मालच कमी येत असल्याने मासेही प्रचंड महागलेत. एकीकडे भाज्या, कडधान्ये कडाडलीत तर दुसरीकडे मांसाहारही महागल्याचे चित्र आहे. सुरमई तब्बल 1 हजार रुपये किलो तर पापलेट 1300 रुपये किलोने मिळतेय. त्यामुळे अस्सल खवय्यांची अक्षरशः गोची झाली असून 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी सुरू होणार आहे. त्यामुळे मासे स्वस्त होण्यासाठी आणखी 15 दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे मासेविव्रेत्यांनी सांगितले.
सध्या गुजरात, हावडा बंदर, पोरबंदर येथून मासे मुंबईसह महाराष्ट्राच्या बाजारात येत आहेत. मोठय़ा प्रमाणावर माल हा फ्रोझनचा आहे. त्यामुळे मासे महाग असल्याचे ठाण्यातील अरुण फीश सप्लायरचे मालक आणि मासेविव्रेते अरुण साजेकर यांनी सांगितले. मोठय़ा प्रमाणावर माल रस्तेमार्गेही येतो. मात्र रस्त्यांची चाळण झाल्यामुळे माल उशिरा बाजारात येतो. तसेच मोठय़ा प्रमाणावर माल खराबही होतो. रस्त्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे मासेच नाही तर भाज्या बाजारात वेळेत पोहोचत नाहीत आणि त्याचा फटका व्यापारी, किरकोळ विव्रेत्यांना बसत असल्याचे चित्र आहे.
मासे (प्रतिकिलो) आधी आता
सुरमई 450 रु. 1000 रु.
कोळंबी 380 रु. 600 रु.
पापलेट 800 ते 1000 रु. 1300 रु.
बोंबील 200 ते 250 रु. 700 रु.
बांगडा 200 रु. (पाच नग) 200 रु. (तीन नग)
वाम 400 ते 500 रु. 1000 रु.
हलवा 350 ते 400 रु. 800 रु.
रावस 350 ते 400 800 रु.
मासेमारी बंद असल्यापासून 40 टक्के नुकसान
1 जूनपासून मासेमारी बंद आहे. तेव्हापासून बाजारात माल कमी येत आहे. प्रह्झनचा माल अनेकदा टिकत नाही. मासेमारी बंद असली तरी खवय्यांची संख्या मोठी आहे. श्रावण सुरू होण्यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर मासे खरेदीसाठी ग्राहक येतात. परंतु मालच कमी असल्यामुळे 40 टक्के नुकसान होत असल्याचे मासेविव्रेत्यांनी सांगितले.
1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार मासेमारी
z पावसाळ्यात दोन महिने बंद असलेली मासेमारी येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर, तर 15 मे ते 15 जुलैदरम्यान पूर्व किनारपट्टीवर मासेमारी बंद असते.
z तब्बल 60 दिवसांच्या या काळात माशांच्या साठय़ांचे संवर्धन करणे, तसेच वादळवाऱयासह येणाऱया पावसामुळे मच्छीमारांचे नुकसान होऊ नये यासाठी मासेमारी बंद ठेवण्यात येते. आता महाराष्ट्राच्या सातही सागरी जिह्यांत पुन्हा मासेमारी सुरू होणार आहे.
z वेसाव्यातील 200 ते 250 मच्छीमार बोटींपैकी काही बोटी 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी सज्ज झाल्याचे वेसावा नाखवा मंडळाचे सेव्रेटरी पराग भावे यांनी सांगितले.