मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले प्रचंड प्रदूषण पालिकेने केलेल्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीमुळे कमी होत असल्याने हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस सर्वात प्रदूषित असणाऱ्या बोरिवली, वरळी आणि कुलाब्यासारख्या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स शंभरच्या खाली नोंदवला गेल्याने हवेची ‘समाधानकारक’ नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत थंडीला सुरुवात झाल्यानंतर हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली जात होती. मुंबईत सुरू असलेली पाच हजारांवर बांधकामे, रस्त्यांची कामे यामधून उडणारी धूळ कारणीभूत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने बांधकामांसाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. याची अंमलबजावणी होत आही की नाही याची पाहणी करण्याकरिता सर्व 24 वॉर्डमध्ये टीम तैनात करून तपासणी सुरू आहे. तर बोरिवली पूर्व आणि भायखळा येथील सर्व प्रकारची बांधकामे प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत बंद करण्याचे निर्देशही पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. याचे चांगले परिणाम आता दिसू लागले असून हवेची गुणवत्ता ‘एक्यूआय’नुसार ‘समाधानकारक’ नोंदवली जात आहे. मुंबईत सरासरी एक्यूआय 119 इतका नोंदवला गेला आहे.
अशी होते एक्यूआयची तपासणी
हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते. तर 51 ते 100 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यूआय’ – ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’ – ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.
आजची ‘एक्यूआय’ स्थिती
बोरिवली पूर्व एक्यूआय 98 हवा समाधानकारक
भांडुप पश्चिम एक्यूआय 98 हवा समाधानकारक
कुलाबा नेव्ही नगर एक्यूआय 79 हवा समाधानकारक
वरळी सिद्धार्थनगर एक्यूआय 88 हवा समाधानकारक
भायखळा एक्यूआय 158 मध्यम दर्जाची हवा
घाटकोपर एक्यूआय 282 ‘खराब’ हवेची नोंद