शिवडीतील 3 हजार कुटुंबांचा 40 वर्षांचा पाणीप्रश्न मिटला, शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मिळाली अधिकृत नळजोडणी 

गेली सुमारे 40 वर्षांपासून शिवडीतील 3 हजार झोपडय़ांमध्ये राहणाऱया कुटुंबांचा पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या कुटुंबांना आता हक्काची नळ जोडणी मिळायला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या पाठपुराव्यामुळे बीपीटीतील या 3 हजार कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. रहिवाशांनी शिवसेना आणि पाणी हक्क समितीचे आभार मानले आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असलेल्या शिवडी पूर्व विभागातील राजीव गांधीनगर, शिवडी गाडी अड्डा, गिरीनगर, रेती बंदर, इंदिरानगर हाजी बंदर,  इंदिरानगर पर्ह्स बेरी रोड, कोळसा बंदर, अमन शांती नगर, जय भीम नगर, पारधी वाडा या विभागामध्ये पाण्याची कोणतीही सुविधा नव्हती. या रहिवाशांचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या माध्यमातून 2021 च्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून 6 उंचाची जलवाहिनी टाकण्यात आली होती. परंतु ही जागा ही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे या जलवाहिनीतून पाणी कनेक्शन देण्यासाठी लागणारी बीपीटीची मंजुरी मिळत नव्हती. अखेर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्याने फेब्रुवारीत मुंबई पोर्ट ट्रस्टने या जलवाहिनीतून पाणी कनेक्शन घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर पालिकेने रहिवाशांचे पाणी कनेक्शनसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली. इंदिरानगर पर्ह्स बेरी रोडवरील 10 रहिवाशांनी केलेला संयुक्त अर्ज महापालिकेने मंजूर केला. या जलवाहिनीच्या माध्यमातून या सर्वांच्या घरोघरी नळ बसवण्यात आले आणि आजपासून पाणीपुरवठादेखील सुरू झाला. यावेळी रहिवाशांबरोबर शिवसैनिक, समितीचे पदाधिकारी प्रवीण बोरकर उपस्थित होते.

अनधिकृत नळजोडणी चिंता तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱया विविध आजारांच्या भितीच्या छायेत गेली 40 वर्षे हे रहिवासी राहत होते. मात्र, त्यांची पाण्याची ही चिंता आता कायमची मिटली आहे. यामुळे पालिकेच्या महसुलातही वाढ होणार आहे.

z सचिन पडवळ, माजी नगरसेवक, शिवडी-काळाचौकी, प्रभाग क्रमांक 206