गोवंडी ‘शताब्दी’ रुग्णालयातील ‘एमआरआय’ची दुरुस्ती सुरू, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयातील बंद असलेल्या एमआरआय मशीनमुळे गोरगरीबांना मनःस्ताप सहन करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार शिवसेनेने उघड केल्यानंतर पालिकेकडून रुग्णालयातील एमआरआय मशीनची दुरुस्ती सुरू असून दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणच्या एमआरआय मशीन तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवक-बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याकडे केली होती.

गोवंडी शताब्दी रुग्णालयात एमआरआय मशीन बंद असल्याने या ठिकाणी येणाऱया रुग्णांना या चाचणीसाठी राजावाडी रुग्णालय, पंतनगर, घाटकोपर येथे पाठवले जाते. राजावाडी रुग्णालयात एमआरआय रुग्णालयात तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते, इतका ताण आहे. पावसात पाणी साचण्याचे व ट्रफिकचे अडथळे पार करून वेळेवर पोहोचता येत नाही. तसेच प्रवास खर्चाचा अतिरिक्त भार गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागतो. याबाबत चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आदी भागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे शताब्दी रुग्णालयातील एमआरआय मशीन तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी अनिल पाटणकर यांनी केली होती. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या मशीन सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. याबाबत पालिकेने स्पष्टीकरण देताना संबंधित रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर कंपनीकडून दुरुस्ती सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.