अतिवृष्टीमुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज गेले वाहून, दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पावसामुळे मंत्री, आमदार आणि विधिमंडळाचे कर्मचारी वेळेवर पोहोचू शकले नाहीत त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्यामुळे अधिवेशनाचा कालावधी एक दिवसासाठी वाढवण्याची मागणी विरोधकांनी केली.

विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात घोषणा केली.
अधिवेशनाच्या दुसऱया आठवडय़ाचे नियमित कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. मात्र, तेव्हा सभागृहात अवघे 17 सदस्य उपस्थित होते. त्यामुळे कोरमअभावी (गणपूर्ती)अभावी दुपारी एक वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केली.

एक वाजता पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळातील अधिकारी, कर्मचाऱयांच्या संख्येकडे लक्ष वेधले. आमदारांप्रमाणे अनेक कर्मचारी जागोजागी अडकले आहेत. शिवाय, दुपारी 1.37 वाजता समुद्रात मोठी भरती आहे, तर दुसरीकडे याच काळात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. विधिमंडळासह सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचारी, अधिकाऱयांना सुरक्षितपणे वेळेत घरी पोहचायला हवे. त्यासाठी दिवसभराचे कामकाज थांबविणे गरजेचे असल्याचे नार्वेकर म्हणाले.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाच्या संदर्भातील दुपारपर्यंतची माहिती सभागृहाला दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रात्रीपासून राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग जिह्यात गेल्या 24 तासांत 216 मिमी पाऊस झाला. 374 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मुंबई उपनगरातील सखल भागांत पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. पाणी साचल्यामुळे हार्बर लाईन बंद ठेवावी लागली. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अतिवृष्टी आणि हायटाईड एकत्रित येतात तेव्हा पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे एपंदरीत स्थिती पाहता विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अधिवेशन कालावधी वाढवा

त्यापूर्वी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सोमवारी विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्यामुळे कामकाजाचा एक दिवस वाया गेला. 12 जुलै रोजी विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे कामकाज पूर्ण क्षमतेने होऊ शकणार नाही. सभागृहाचे बरेच कामकाज प्रलंबित असल्यामुळे अधिवेशन कालावधी किमान एका दिवसाने वाढवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर, ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून सकारात्मक निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

नालेसफाईची श्वेतपत्रिका काढा

तर भाजप आमदार यांनी नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांमुळे सर्वच पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी ज्यावेळी निवडणुकीच्या कामात होते, त्यावेळी पालिका अधिकाऱयांनी लक्ष न दिल्यामुळे मुंबईतील मोठे नाले, छोटी गटारे यांची सफाई पंत्राटदारांकडून योग्यप्रकारे झाली नाही. नाल्यातील गाळ पूर्ण निघाला नाही. काढलेला गाळ उचलला गेला नाही. आम्ही त्यावेळी दौरा करुन ही बाब पालिका अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यानंतरही कामे झाली नाहीत. म्हणून मुंबईच्या नालेसफाईची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.