
मुंबईत दोन दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान तब्बल आठ हजार तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात नोंदवल्या गेल्या. यामध्ये पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, झाड-फांदी कोसळली, गटार तुंबले आदी प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या. आपत्कालीन विभागातील 1916 या टोल फ्री क्रमांकावर या तक्रारी आल्या. या तक्रारींचा निपटारा संबंधित विभागाकडून करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरात सोमवार, 8 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजल्यापासून 9 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 400 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला. या अतिवृष्टीमुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबल्याचे प्रकार समोर आले. भांडुप, कुर्ला, चुनाभट्टी आदी भागांत पाण्याचा निचरा संथगतीने होत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आपत्कालीन विभागाची महत्त्वपूर्ण बैठकही आज पार पडली. यावेळी पालिकेसह मुंबईतील विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी पाणी तुंबण्याची कारणे शोधून तातडीने उपायायोजना करा, असे निर्देश संबंधितांना दिले.