जीपीएसने घेतला तीन मित्रांचा जीव, रामगंगा नदीत गाडी पडून तिघांचा मृत्यू

अलिकडे कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचायचे असल्यास जीपीएस हा उत्तम पर्याय मानला जातो. मात्र उत्तर प्रदेशात तीन मित्रांना जीपीएसची मदत जीवावर बेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एक कार रामगंगा नदीत पडून तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर जीपीएस यंत्रणेमुळे हा अपघात झाल्याचा दावा मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे. कारण जीपीएसच्या मदतीने ही मुलं गाडी चालवत होती.  फरीदपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रामगंगा नदीवरील बदायूंतील फरीदपूर-दातागंजला जोडणाऱ्या अपूर्ण पुलावर सकाळी 10 च्या सुमारास अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरी येथील कौशल कुमार, फारुखाबादचा विवेक कुमार आणि अमित अशी मृत तरुणांची नावे आहेत. कार दातगंजकडून येत होती. दरम्यान, पुलाचे काम पूर्ण होताच कार अपूर्ण पुलावर चढली आणि नंतर नदीत पडली.

याबाबत मंडळ अधिकारी आशुतोष शिवम यांनी सांगितले की, पावसात नदीला आलेल्या पुरामुळे पुलाचा पुढील भाग नदीत पडला होता, मात्र हा बदल यंत्रणेत अद्ययावत करण्यात आलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, ड्रायव्हर नेव्हिगेशन सिस्टम वापरत होता आणि पुल असुरक्षित असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही, ज्यामुळे कार खराब झालेल्या भागावरून खाली पडली. शिवाय त्या रस्त्यावर कुठेही सूचना देणारे फलक लावलेले नव्हते. त्यामुळे हा जीवघेणा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच फरीदपूर, बरेली आणि दातगंज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नदीतून गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.

गाडी पुलावरून पडल्याची माहिती गावकऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ जाऊन मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले. पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचलेल्या कुटुंबीयांनी असाही दावा केला आहे की कारमध्ये प्रवास करणारे सर्व लोक जीपीएसवर अवलंबून होते. पुलावरून गाडी जात असताना अचानक पूल अर्ध्यावरच संपला. त्यामुळे कार अनेक फूट नदीत पडली. पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने तसेच बॅरिकेड्सही बसविण्यात आले नसल्याने याप्रकरणी कुटुंबीयही विभागीय अधिकाऱ्यांवर आरोप करत आहेत.