जलद लोकल थांब्याचा पहिल्याच दिवशी फियास्को; नोकरदारांची धावाधाव, शिवसेनेने स्टेशन मास्तरला विचारला जाब

जलद लोकल कळवा स्थानकात थांबावी यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वारंवार पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून दोन जलद लोकलचा कळवा स्थानकात थांबा देण्यात आला. मात्र पहिल्याच दिवशी जलद लोकल दिलेल्या फलाटावर न थांबता दुसऱ्या फलाटावर थांबल्याने शेकडो नोकरदारांची चांगलीच धावाधाव झाली. याची दखल घेऊन शिवसैनिकांनी स्टेशन मास्तरच्या कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.

शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर कळवा स्थानकात जलद लोकलचा थांबा देण्यात आला. मात्र ‘मरे’च्या भोंगळ कारभारामुळे सकाळी 8.54 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावणारी जलद लोकल फलाट क्रमांक दोनऐवजी येणारी 4 वर आली. त्यामुळे लोकलसाठी थांबलेल्या हजारो प्रवाशांचा गोंधळ उडाला आणि सर्वांची धावाधाव झाली. याविरोधात उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांनी स्टेशन मास्टरला जाब विचारला. त्यावर प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करत यापुढे काळजी घेऊ असे आश्वासन दिले.

अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

मध्य रेल्वेच्या नियोजनशून्य कामाचा फटका चाकरमान्यांना बसला. यापुढे असे होता कामा नये तसेच सर्व उद्घोषणा व्यवस्थित झाल्या पाहिजे अशी सक्त ताकीद शिवसैनिकांनी दिली. यावेळी मृणाल यज्ञेश्वर, विजय देसाई, कल्पना कवळे, नीलिमा शिंदे, पुष्पलती भानुशाली, श्रीकांत मोरे, लहू चाळके, नंदू पाटील, संतोष कवळे, संतोष सुर्वे, दुर्योधन फडतरे, छाया आरमृगम, संजय लोटणकर, राजेंद्र दाते, राजेंद्र सातवेकर, प्रदीप जाधव, नंदू दुराफे, संजय म्हाब्दी, सज्जाद सावंत, अर्चना बागवे, दत्तात्रय राऊत, अनिल चक्रवर्ती, मुकेश सोदे, महेश साजेकर आदी उपस्थित होते.