
धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताने 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ‘आज अर्ज आणि उद्या कर्ज’ असा फंडा राबवत मुंडे यांनी कुणाचीही मागणी नसताना खरेदीचा सपाटा लावला. विशेष म्हणजे या खरेदीचे टेंडरही गुपचूप काढण्यात आल्याचा गौप्यस्फोट करून आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य पुरवठा करणाऱ्या पंत्राटदारांच्या सोयीसाठी अध्यादेश बदलले. एकात्मिक कापूस, सोयाबीन संवर्धन आणि उत्पादन वाढ या योजनेसाठी सरकारने एक हजार कोटी रुपये खर्चाची घोषणा केली होती. या योजनेमध्ये धनंजय मुंडे यांनी अनेक अध्यादेश बदलून अनावश्यक मुद्दे टाकून घोटाळा केला. नॅनो डीपी, कापूस साठवणूक बॅगा, गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे औषध, कृषी बॅटरी पंप या साहित्यात प्रचंड घोटाळा झाल्याचे पुरावेच त्यांनी दाखवले.