कोल्हापुरात पावसाची उघडझाप; 14 बंधारे अजूनही पाण्याखाली

जिह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. आज दिवसभरात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.

नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पंचगंगेच्या पातळीत सव्वा फूट वाढ होऊन ती 21 फूट झाली होती, तर 14 बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. आज सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून अजूनही 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ; वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव; भोगावती नदीवरील कोगे; कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत, तर पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 21.11 फूट, सुर्वे 22, रुई 50, इचलकरंजी 47.8, तेरवाड 44, शिरोळ 33, नृसिंहवाडी 26, राजापूर 16.3, तर नजीकच्या सांगली 9.9 आणि अंकली बंधाऱ्याची पाणीपातळी 11 फुटावर होती.

शाहूवाडी येथे 74.4 मि.मी. पाऊस

कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक 74.4 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर हातकणंगले 11.5, शिरोळ 3.3, पन्हाळा  63.7, राधानगरी 31.8, गगनबावडा 48.4, करवीर  18.1, कागल 23.4, गडहिंग्लज 23.1, भुदरगड 35.7, आजरा 34.5 आणि चंदगड तालुक्यात 58 मि.मी. असा एकूण जिह्यात 32.7 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.