गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलाल टाकण्यावरुन शिवाजीनगर भागात दोन गणेश मंडळांत 17 सप्टेंबर रोजी वाद झाला होता. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी 14 आरोपींना अटक केली होती. यापैकी एका आरोपीला ब्रेनस्ट्रोक झाल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो शेवटच्या घटका मोजत आहे. या तरुणाची ही परिस्थिती पोलिसांच्या छळामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शंभुनगर भागात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल टाकण्यावरुन हिंदू स्वराज गणेश मंडळ आणि जय योगेश्वर गणेश मंडळ यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. याप्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणी तब्बल 14 जणांना अटक करण्यात आली होती. या तरुणांमध्ये प्रतीक राजू कुमावत (21, रा. शंभुनगर) या तरुणाचा देखील समावेश होता. प्रतीकला 18 सप्टेंबरला पहाटे तीन वाजता जबाब घेण्याचे कारण दाखवत पोलीस घरातून घेऊन गेले होते. त्याला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर अटक करण्यात आली. 19 सप्टेंबरला त्याला कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी त्याला कोर्टातच भोवळ आली होती. त्याच्या पालकांनी त्याला हॉस्पीटलमध्ये नेण्याची विनंती केली, मात्र पोलिसांनी ती ऐकली नाही. प्रतीकला अटक केलेल्या इतर तरुणांसोबत पुन्हा पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणीदेखील प्रतीकने डोके दुखत असल्याचे पोलिसांना सांगितल्यानंतर ‘तू का मरणार आहेस का?’ अशी भाषा पोलिसांनी वापरल्याचा आरोप कुमावत यांनी केला आहे. प्रतीकची प्रकृती खराब झाल्यामुळे सायंकाळी त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याची तब्येत खराब असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला 20 सप्टेंबरला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती दिली. तेव्हापासून प्रतीक उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्रतीकच्या या परिस्थितीला केवळ पोलीस जबाबदार असल्याचे म्हणत नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी या जमावाची होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, संदीप शिरसाट तसेच सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन जाधव आदींनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आज निवेदन देणार
या प्रकरणात प्रतीकची प्रकृती बिघडलेली आहे. यामुळे प्रतिक कुमावत यांच्याबाबत पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळाच्या माध्यमातून गुरुवारी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती नंदकुमार घोडले यांनी दिली.