झाशी मेडिकल कॉलेजमधील आग प्रकरण, स्विच बोर्डमधील शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडल्याचे अहवालात उघड

झाशी येथील मेडिकल कॉलेजमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. तर 16 बालके जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, या घटनेबाबत कोणतेही षडयंत्र किंवा निष्काळजीपणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयसीयूतील स्विच बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडून आगीची दुर्दैवी घटना घडली.

स्वीच बोर्डमधील आग वॉर्डात लावलेल्या मशिन्सच्या प्लॅस्टिक कव्हरपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पाहता पाहता संपूर्ण वॉर्ड आगीच्या भक्षस्थानी गेला. घटनेवेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने आग विझवण्याचा आटोकात प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. आग विझवताना नर्सचे पाय आणि कपडे देखील जळाले.

घटनेच्या वेळी एनआयसीयू वॉर्डमध्ये 6 परिचारिका, इतर कर्मचारी आणि 2 महिला डॉक्टर उपस्थित होते. आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी डीजीएमईच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. चौकशी समितीच्या सविस्तर अहवालात शॉर्ट सर्किट कसे झाले? प्रभागात बसवलेल्या मशिनवर ओव्हरलोड आल्यामुळे शॉर्ट सर्किट झाले का? हे उघड होईल.

झाशीचे आयुक्त आणि डीआयजी यांच्या समितीने घटनेच्या वेळी उपस्थित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केला असून, यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एनआयसीयू वॉर्डमध्ये नवजात बालकांना ठेवले जाते. यामुळे तेथे पाण्याचे स्प्रिंकलर बसवले जात नसल्याचे डॉक्टरांनी चौकशी समितीला सांगितले.

आग लागल्यानंतर तिघा कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिनगुइशरद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग बरीच पसरल्याने त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. यानंतर अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यास यश आले.