दुबईच्या शहजादीचा ऑनलाइन तोरा, नवऱयाला इन्स्टाग्रामवरून दिला तलाक!

दुबईच्या पंतप्रधानांची लेक शहजादी शेख माहरा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूमने नवऱयाला ऑनलाईन सोडचिठ्ठी दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूमला तलाक दिला. ‘तुम्हाला आता इतरांचा सहवास प्रिय झाला आहे. त्यात तुम्ही गुंतला आहात. त्यामुळे मी तुमच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. तलाक… तलाक… तलाक… आपलं नातं आता संपलं. काळजी घ्या… तुमची पूर्वाश्रमीची पत्नी’, असे या पोस्टमध्ये माहराने नमूद केले असून या काडीमोडाची जगभरात चर्चा आहे.

शेख माहराने गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर दोनच महिन्यांत तलाकची घोषणा केली आहे. शेख माहरा यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले तसेच आपल्या प्रोफाइलवरून एकमेकांचे पह्टोही काढून टाकले आहेत. या दोघांनी एकमेकांना ब्लॉक केल्याचा तर कदाचित शेख माहराचे इन्स्टा अकाऊंट हॅक झाले असावे असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला. दरम्यान, दोनच आठवडय़ांपूर्वी माहराने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीला पुशीत घेतलेला फोटो पोस्ट केला होता. तसेच त्याच्यासोबत आता फक्त आपण दोघे अशी पोस्टही केली होती.