Dubai Prince- दुबईच्या क्राऊन प्रिन्सने कन्येचं नाव ठेवलं ‘हिंद’! जाणून घ्या हिंद नावामागचा इतिहास

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या कन्यारत्नाचे नाव हिंद बिंत हमदान बिन मोहम्मद अल मकतूम असे ठेवण्यात आले आहे. त्यांचे हे चौथे अपत्य असून, शेख हमदान यांना आधीची तीन मुले आहेत. यामध्ये जुळी मुले रशीद आणि शेखा, मे 2021 मध्ये जन्मली आणि मुलगा मोहम्मद, फेब्रुवारी 2023 मध्ये जन्माला आला होता.

शेख हमदान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी सर्वांसोबत नुकतीच शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना त्यांनी मुलीचा फोटोही टाकलेला आहे.. शेख हमदान यांच्या आई शेखा हिंद बिंत मकतूम यांच्या सन्मानार्थ मुलीचे नाव हिंद ठेवण्यात आले आहे. ज्या दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या पत्नी आहेत. शेख हमदान यांनी २०१९ मध्ये शेखा शेखा बिंत सईद बिन थानी अल मकतूम यांच्याशी लग्न केले.

हिंद नावाचा अर्थ काय आहे?
हिंद या नावाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भाषिक महत्त्व आहे, विशेषतः अरबी भाषिक आणि इस्लामिक परंपरेत. हे शतकानुशतके वापरले जात आहे आणि त्याचे अनेक अर्थ आहेत. शक्ती, विपुलता आणि वारसा यांचे प्रतीक हे हिंद नावामध्ये आहे. प्राचीन काळी हिंद म्हणजे संपत्ती आणि समृद्धी. एखाद्याला हिंद हे नाव देणे म्हणजे सहनशक्ती आणि विपुलता यासारख्या गुण अंगी यावेत हाच एक अर्थ असायचा.

ऐतिहासिकदृष्ट्या, हिंद हे नाव इस्लामपूर्व पासून वापरले जात होते. तसेच इस्लामच्या आगमनानंतरही हिंद हे नाव प्रचलित राहिले होते. हिंद बिंत उत्बा ही इस्लामिक इतिहासातील एक प्रभावशाली महिला होती. ती तिच्या बुद्धिमत्तेसाठी, नेतृत्वासाठी आणि नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ओळखली जायची.