अलिबागमध्ये तर्राट पर्यटकांचा रस्त्यावर धिंगाणा, रुग्णवाहिकेसह अनेक गाड्यांना धडकः पोलिसांशी हुज्जत

समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या चार तर्राट पर्यटकांनी गुरुवारी अलिबागमध्ये चांगलाच धिंगाणा घातला. या पर्यटकांनी मद्यधुंद अवस्थेत बेकरदारपणे गाडी चालवत रुग्णवाहिकेसह अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर या बेशिस्त हुल्लडबाजांनी स्थानिकां सह पोलिसांसोबत हुज्जत घातली. हे चौघेही पर्यटक पुणे येथून मौजमजा करण्यासाठी अलिबागमध्ये आले होते. या टारगटांमध्ये एका तरुणीचा समावेश असून या सर्व हुल्लडबाजांना रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पुणे येथे राहणारा सूरज सिंग हा आपल्या दोन मित्र व एका मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी अलिबाग येथे आला होता. दरम्यान या पर्यटकांनी दिवसभर दारू ढोसल्यानंतर धुडगूस घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे हुल्लडबाज अलिबाग येथून रेवदंडा येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला धडक दिली. तेथे स्थानिकांसोबत हुज्जत घालून पुढे निघाल्यानंतर त्यांनी रेवदंडा बायपासजवळ एका वाहनाला जोरदार धडक दिली.

दारूच्या बाटल्या सापडल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत तर्राट पर्यटकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासोबतही अर्वाच्य भाषेत अरेरावी केली. दरम्यान या पर्यटकांच्या गाडीत दारूच्या बाटल्याही आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.