नववर्षाच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी आणि घाटकोपर युनिटने कारवाई करून ड्रग्ज तस्करांना दणका दिला. पोलिसांनी कारवाई करून 1.65 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. दोन नायजेरियनसह चौघांना पोलिसांनी अटक केली. नयुम शेख, संजीब सरकार, मोहम्मद बाष्टिस्टा आणि फेथ इग्नीबोसा अशी या चौघांची नावे असून त्या चौघांकडून पोलिसांनी कोकेन, एमडी आणि कोडेंन बॉटल्स जप्त केल्या आहेत. देवनार येथे काही जण कोडेन बॉटल्सची डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून नयूम शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 900 बॉटल्स जप्त केल्या. त्याची किंमत साडेचार लाख रुपये आहे, तर कुर्ला परिसरात कोकेन विक्रीसाठी आलेल्या संजीब सरकारला पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 1 कोटी 18 लाख रुपये आहे. आग्रीपाडा परिसरात आलेल्या दोन नायजेरियन व्यक्तींना 42 लाखांच्या एमडीसह वरळी युनिटने ताब्यात घेतले.