कंटेनरमधून ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोंडीबा गुंजाल असे आरोपीचे नाव असून तो तीन वर्षे कोठडीत आहेत. या अवधीत सरकारी पक्षाने खटला चालवण्यासाठी काहीच केले नाही. तसेच प्रथमदर्शनी आरोपीचा गुह्यात सहभाग असल्याचे ठोस पुरावे दिसून येत नाहीत, असे निरीक्षण न्यायमूर्ती भरत देशपांडे यांनी नोंदवले.
आरोपी कोंडीबा गुंजाल हा एआरडी लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये कस्टम्स हाऊस एजंट म्हणून काम करीत होता. त्याने अफगाणिस्तानमधून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या इतर आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने रायगड परिसरात संशयास्पद पंटेनरवर छापा टाकून झडती घेतली होती. त्यावेळी एकूण 191 किलोग्रॅम ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर गुंजालला 9 ऑगस्ट 2021 मध्ये अटक केली होती. त्याने डॉ. सुजय कांतावाला आणि अॅड. करण जैन यांच्यामार्फत जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
दीर्घकाळ कोठडीमुळे मूलभूत हक्कांवर गदा
ड्रग्ज तस्करीच्या या प्रकरणात 54 साक्षीदार तपासले जाणार आहेत. मात्र अद्याप आरोपनिश्चितीच केलेली नाही. त्यामुळे खटला लवकर संपण्याची शक्यता नाही. तसेच आरोपीच्या सहभागाचे प्रथमदर्शनी ठोस पुरावेही नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीला दीर्घकाळ कोठडीत ठेवण्यामुळे मूलभूत हक्कांवर गदा येते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी गुंजालला एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून देण्याचे आदेश दिले.