ममता कुलकर्णीला दिलासा, 8 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात हायकोर्टाचा FIR रद्द करण्याचा आदेश

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2016 च्या ड्रग केस प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केली. यात ममता कुलकर्णीवर दाखल झालेले सर्व गुन्हे बिनबुडाचे असून हे सर्व केवळ त्यांना त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे. न्यायालयात जे पुरावे सादर केले आहेत ते ममता कुलकर्णी यांना दोषी मानण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे पुराव्यांअभावी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करत त्यांची या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

ठाण्यातील 2000 कोटी रुपयांच्या अमली पदार्थ जप्ती प्रकरणात ममता कुलकर्णीविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हे प्रकरण बिनबुडाचे असून हे केवळ त्रास देण्यासाठी आहे, असे न्यायलयाने म्हटले आहे. हे प्रकरण वाढवणे म्हणजे न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग असेल. याचिकाकर्त्याविरोधात खटला चालू ठेवल्याने न्यायालयाच्या प्रक्रियेचा गैरवापर होईल, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हे प्रकरण फेटाळताना न्यायालयाने ममता कुलकर्णी हिच्याविरोधात जे पुरावे आहेत ते त्यांचा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत. उच्च न्यायालयाने 22 जुलै रोजी ममता कुलकर्णी हिच्या विरोधात हे प्रकरण फेटाळले होते. मात्र सविस्तर आदेश बुधवारी म्हणजेच 7 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आला, असे फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.