डाऊदच्या ड्रग्ज कारखान्याचा पोलिसांकडून पर्दाफाश, 327 कोटींचा मुद्देमाल जप्त; 15 जणांना अटक

मिंधे सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत असून पुणे, नाशिकसारखी मोठी शहरं ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहेत. विशेष म्हणजे पूर्वी महाराष्ट्रात बाहेरून ड्रग्ज येत होते, आता इथेच बनतात अशी धक्कादायक कबुलीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये दिली होती. याचीच प्रचिती आज आली असून मीरा रोडे येथे पोलिसांनी डाऊदच्या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.

ठाण्यातील घोडबंदर भागात पोलिसांनी ड्रग्जची एक मोठी खेप पकडत दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून डी कंपनीच्या ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मीरा रोड येथे छापा टाकत 327 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान 15 जणांना अटक करण्यात आली असून 3 पिस्टल व एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाऊद गँगचा सदस्य सलीम डोला याचा मास्टरमाईंड असून त्याच्या देखरेखीखाली हा कारखाना चालवला जात होता. येथून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत ड्रग्ज पुरवठा केला जात होता.

मुंबई पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी या संबंधी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. पोलीस कारवाईदरम्यान 327 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हा कारखाना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा खास माणूस सलीम डोला चालवत होता. अटक केलेल्यांच्या तो संपर्कात होता. त्याच्याविरोधात आता लुटआऊट नोटीस जारी करण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.