![bail granted](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/bail-granted-696x447.jpg)
मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांच्या वाढत्या संख्येबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. आर्थर रोड तुरुंगात क्षमतेपेक्षा पाच ते सहा पट जास्त कैदी भरले असून अमानवीय परिस्थिती निर्माण झाली आहे असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
समीर शेख या आरोपीला नार्कोटिक्स विभागाने अमली पदार्थप्रकरणी गुन्हा दाखल करत जून 2021 मध्ये अटक केली. शेख याच्याकडे 52 ग्रॅम एमडी सापडल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. शेख साडेतीन वर्षांपासून तुरुंगात असून जामिनासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. निमेश मेहता यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना नमूद केले की, तुरुंगांची गर्दी आणि अमली पदार्थांचे व्यसन ही समाजासाठी एक गंभीर समस्या आहे. अमली पदार्थ जप्तीच्या वेळी तपास यंत्रणांकडून अचूक वजन नोंदवण्यात संदिग्धता होती, तसेच खटला पूर्ण न होता आरोपीला सुमारे चार वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.