पावसाळा हा सगळ्या जीवसृष्टीसाठी आवश्यक ऋतू आहे. पावसाळ्यातील निसर्गरम्य दृश्य, हिरवी झाडं, तुंडुंब भरलेल्या नद्या पाहून मन प्रसन्न होत. यंदा महाराष्ट्रात हे क्षण अनुभवता आले. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे काही देशांना यंदा तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या वर्षीचा फेब्रुवारी महिन्यापासूनच झिम्बाब्वेमध्ये दुष्काळ पसरला आहे. हा 1981 नंतरचा सर्वात कोरडा महिना होता. बोत्सवाना आणि अंगोलाच्या काही भागातही याचा परिणाम दिसून आला.
झांबिया, मलावी, झिम्बाब्वे, माली, बोत्सवाना, अंगोला, मोझांबिक या आफ्रिकन देशांना गेल्या चार दशकांपासून या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदा हा दुष्काळ फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाला. ज्याचा प्रभाव अद्यापही दिसून येत आहे. या भागात दुष्काळ पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे, अल नीनोचा प्रभाव. त्यामुळे या भागात पाऊस अजिबात पडला नाही. म्हणून तापमानात लक्षणीय वाढ झाली. पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली. पाणी नसल्याने पीकेच झाली नाही. त्यामुळे तेथील पशु- पक्षी आणि माणसांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शास्त्रज्ञांच्या मते अशा प्रकारचा दुष्काळ 10 वर्षांतून एकदा येतो. पण एल निनोमुळे तो येण्याची आणि दीर्घकाळ टिकण्याची शक्यता दुप्पट होते. नद्या आणि इतर जलाशय कोरडे पडत आहे. या प्रकारच्या हवामानामुळे आफ्रिकेतील कृषी क्षेत्राचे भयंकर नुकसान झाले आहे. आफ्रिकन हॉर्न आणि दक्षिण आफ्रिकन देशांची स्थिती अत्यंत वाईट आहे.