
निघोज शहर आणि परिसरातील गावांत तसेच वाडी वस्तीवर मंगळवारी (दि. 16) रात्री दहा ते एकच्या दरम्यान ड्रोनच्या घिरटया वाढल्याने जनतेमध्ये घबराट पसरली आहे.
प्रशासन तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार नीलेश लंके यांनी याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना विचारणा करावी आणि जनतेच्या मनातील भिती दूर करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. मंगळवारी (दि. 16) रोजी रात्री निघोज, गाडीलगाव, गुणोरे, देवीभोयरे, वडगाव गुंड, मोरवाडी, भांबरेमळा, रसाळवाडी, ढवणवाडी, वडनेर या परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत ड्रोन मोठया संख्येने आकाशात घिरटय़ा घालत आहेत. याबाबत शेजारील पुणे जिह्यातील वडनेर, टाकळीहाजी, माळवाडी, भाकरेवाडी या परिसरातही गेल्या अनेक दिवसांपासून ड्रोन घिरटय़ा घालत आहेत.
याबाबत तेथील जनतेने वेळोवेळी पोलीस व तहसील प्रशासन यांना वेळोवेळी कळविले आहे. मात्र, आजपर्यंत कोणीही ड्रोनबाबत दखल घेतली नाही. विषेश म्हणजे हे ड्रोन सातत्याने या परिसरात लोकांचे लक्ष वेधीत आहे. सहकारमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांनी मात्र याबाबत ड्रोन पकडण्यासाठी ड्रोनगणचा वापर करण्यात येणार असून, याबाबत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन यासाठी पंधरा लाख रुपयांची मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हाच प्रकार सातत्याने नगर जिह्यातील पारनेर, श्रीगोंदा तसेच इतर तालुक्यातील गावात होत आहे. निघोज परिसरात तर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे ड्रोन राजरोसपणे फिरत होते. मात्र, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यासाठी या ड्रोनचा शोध घेण्यासाठी पालकमंत्री विखे, खासदार लंके यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकाऱयांना सुचना देऊन ड्रोनचा शोध घेत जनतेच्या मनातील भिती tर करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.