…तर पासपोर्ट, परवाने रद्द केले जाऊ शकतात! रस्त्यांवर नमाज अदा करण्याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांचा इशारा

driving-licence-can-be-cancelled-if-namaz-offered-on-roads-warn-meerut-up-cops

सध्या रमझानचा महिना सुरू आहे. सोमवारी रमझान ईद साजरी होणार असून ईद-उल-फित्र आणि रमझानच्या शेवटच्या शुक्रवारी महत्त्वाचा नमाज अदा करण्यात येतो. या नमाजपूर्वी, मेरठ पोलिसांनी रस्त्यांवर नमाज अदा करणाऱ्यांविरुद्ध कडक इशारा दिला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल ज्यामुळे त्यांचे पासपोर्ट रद्द केले जाऊ शकतात आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाऊ शकतात.

मेरठचे अधीक्षक पोलीस (शहर) आयुष विक्रम सिंह यांनी पुन्हा सांगितलं आहे की, ईदचा नमाज मशिदी किंवा नियुक्त ईदगाहमध्ये अदा करण्यात यावा आणि कोणीही रस्त्यावर नमाज अदा करू नये.

‘नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हेगारी खटले दाखल झाले तर त्यांचे पासपोर्ट आणि परवाने रद्द केले जाऊ शकतात आणि न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) शिवाय नवीन पासपोर्ट मिळवणे कठीण होईल. न्यायालयाकडून परवानगी मिळेपर्यंत अशी कागदपत्रे जप्त केली जातात’, असे केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) नेते जयंत सिंह चौधरी म्हणाले.

मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) विपिन ताडा म्हणाले की, जिल्हा आणि पोलीस स्टेशन पातळीवर बैठका घेण्यात आल्या आहेत आणि सर्व पक्षांशी झालेल्या चर्चेच्या आधारे आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

‘सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवण्याचा किंवा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल’, असे एसएसपी म्हणाले.

सुरक्षा बळकट करण्यासाठी, प्रांतीय सशस्त्र कॉन्स्टेब्युलरी (पीएसी) आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ) चे जवान तैनात करण्यात आले आहेत आणि जिल्ह्यात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहेत, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

भूतकाळातील घटनांवरून संवेदनशील क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत आणि तिथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

शांतता राखण्यासाठी आणि आगामी सणांचे सुरळीत पालन करण्यासाठी प्रशासन प्रमुख नागरिक आणि धार्मिक नेत्यांशी समन्वय साधत आहे यावर एसएसपी ताडा यांनी देखील भर दिला.

कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी, जयंत सिंह चौधरी म्हणाले की, हवाई देखरेखीसाठी ड्रोन तैनात केले जातील, तर स्थानिक गुप्तचर पथके परिस्थितीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहेत.

सर्व संवेदनशील ठिकाणी गणवेशधारी आणि साध्या वेशातील अधिकारी देखील तैनात असतील, असेही त्यांनी सांगितले.

मेरठ पोलिसांनी इशारा दिला आहे की आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींचा पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केला जाऊ शकतो, नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी न्यायालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक आहे.