सोमवारपासून राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड

रामलल्लाची पूजा करणाऱया पुजाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. राम मंदिराचे पुजारी आता पांढरे धोतर आणि पिवळा सदरामध्ये दिसणार आहेत. मंदिर ट्रस्ट लवकरच सर्व पुजाऱ्यांना कपडे पुरवणार आहे. तसेच रामलल्लाची पूजा करणाऱ्या सर्व 25 पुजाऱ्यांना राम मंदिर ट्रस्टने कीपॅड फोन दिले आहेत. आता राम मंदिरात पुजारी फक्त कीपॅड फोनच वापरू शकतील, अँड्रॉईड फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नवीन पुजाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना राम मंदिराच्या आचारसंहितेची माहिती दिली. ट्रस्ट पुजाऱ्यांना उन्हाळ्यासाठी ड्रेसचे तीन संच आणि थंडीसाठी तीन संच पुरवेल. राम मंदिरात बोलण्यासाठी पुजारी केवळ कीपड फोनचा वापर करू शकतील.

राम मंदिरात पूजा करण्यासाठी निश्चित केलेल्या रोस्टरचीही माहिती पुजाऱ्यांना देण्यात आली आहे. नवीन पुजारी जुन्या पुजाऱ्यांसोबत रोस्टरनुसार पूजा करतील. गर्भगृहात तैनात असलेल्या पुजाऱ्यांची डय़ुटी आठ ते दहा तासांची असेल. तर कुबेर टिळा, यज्ञमंडप आणि तात्पुरत्या मंदिरात हनुमानजींच्या पूजेसाठी रोस्टर वेगळा असेल. येथे चार ते सहा तास पुजारी तैनात केले जातील. ही व्यवस्था 22 जुलैपासून लागू होणार आहे.