>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
मानवी जीवनात अंतर्मनातील अथवा सुप्त मनातील ताकद प्रभावीपणे काम करते ते स्पष्टपणे सांगितले आहे. तुमच्या अंतर्मनात अर्थात सुप्त मनात आनंदी विचार व भावना यांची पेरणी करत रहा आणि मग फरक पहा. तुमच्या मनातील सर्व नकारार्थी विचार कुठल्या कुठे लुप्त होतात.
सुख नेमके कशात आहे किंवा सुख कशाला म्हणावे, असे प्रश्न सर्वच मानवी मनाला नेहमीच पडत असतात. त्यातूनच आपल्या स्वतच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, असे प्रत्येकाला वाटत असते. प्रत्येक माणसाच्या वाटय़ाला आलेले जीवन हे संघर्षमय, कष्टमय असले तरी त्यातही सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतोच. जीवनाच्या खडतर वाटचालीत अपार कष्ट, अविश्रांत परिश्रम आणि प्रचंड चिकाटी या जोरावर सुखाचा ज्यांनी ज्यांनी शोध घेतला त्यांच्या जीवनात सुखाचा सूर्य उगवला असल्याचे आपल्याला दिसून येते.
लोकमान्य टिळक हे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही त्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली होती. त्यांचा ‘गीतारहस्य’ हा संपूर्ण ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगातील संघर्षमय व कष्टप्रद तसेच कौंटुंबिक विरहाच्या काळात लिहिला होता हे त्यांचे वैशिष्टय़ होते. ब्रिटिश काळात कारावास भोगावा लागत असतानाही ‘गीतारहस्य’सारखा ग्रंथ त्यांच्या हातून लिहून झाला हे केवळ सकारात्मक विचारांची कास धरल्यामुळेच.
खरे तर प्रत्येकाला आपल्या स्वतच्या जीवनात चांगला, सकारात्मक, आनंददायी बदल व्हावा असे मनापासून वाटत असते; अर्थात तशी आत्यंतिक जरुरी व मनापासून तळमळ मात्र त्या ठिकाणी असली पाहिजे. मनातल्या मनात अर्थात अंतर्मनात आपल्या मनाजोगे व्हावे असे सत्य त्याला वाटले पाहिजे. तशी तळमळ त्याच्या कृतीतूनही दिसली पाहिजे. अर्थात अंतर्मन हे प्रत्येकाच्या जीवनात सुपरिणाम घडवून आणत असते. एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असतानाही मनातून केवळ सकारात्मक विचारांमुळे नेहमी तुम्ही आनंदी राहू शकता. प्रतिकूल परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर पडणार आहे, माझी तशी कुवतच आहे, माझ्यासमोर उभ्या राहिलेल्या गहन परिस्थितीशी मी अत्यंत सहजपणे लढणार आहे; त्यातून मी आनंदाच्या, यशस्वी वाटेकडे निश्चित अगदी नजीकच्या काळात मार्गक्रमण करणार आहे, असा आत्मविश्वास जागृत केला तरी अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा.
तुमचे कुणाशी बिनसले असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून बचाव करायचा असेल आणि त्याच्यापासून दूर जाणे कठीण होत असेल किंवा ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी मनाची भावना झाली असेल तर अशा गंभीर अवस्थेमधून सुटण्यासाठी एक सहज सुलभ उपाय आपण अवलंब करायला हवा. तो म्हणजे स्वतचा स्वाभिमान जागृत करून ‘मी कुठेही चुकत नाही, माझा हेतू पूर्ण प्रामाणिक आहे. समोरच्याच्या मनात वाईट असेल, त्याची नियत खराब असेल किंवा त्याला आपण जे करतो आहे ते चुकीचे आहे याची जाणीव होत नसेल तर आपल्या स्वतचा आत्मसन्मान जागृत करून सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचा त्याग करा. आपल्यामुळे होणाऱया लाभाला आजपासून तोच खऱया अर्थाने मुकला आहे, असे आपल्या मनाला समजवा. आपण मनातून चांगले वागत असताना मी त्रास सहन का करू, असा प्रश्न स्वतच्या मनाला विचारला तर अशा गंभीर परिस्थितीतून सहज मार्ग काढू शकता. यानंतर आपली गाडी सुसाट वेगाने अपेक्षित ध्येयाकडे नेता येते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेकांना आपले काही खरे नाही, हे माझ्याच वाटय़ालाच का आले, मी यातून लवकरात लवकर बरा होईन का? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मनाला घेरून टाकतात. या सर्व प्रश्नांना पुरून उरणारे उत्तर नक्कीच आहे ते म्हणजे ‘आत्मविश्वास’! माझ्या जवळच्या परिचयातील एका व्यक्तीच्या जीबीएससारखी जीवघेणी व्याधी वाटय़ाला आली. अत्यंत उमेदीच्या काळात त्याला या रोगाने पछाडले. सुरुवातीला तो खचून गेला. शरीरातील ताकद पूर्णपणे नष्ट होत आली. त्यामुळे तो पुरता हतबल झाला. त्याच्या मनाला असंख्य प्रश्नांनी जेरबंद केले, पण थोडय़ाच दिवसांत वैद्यकीय उपचारांबरोबरच त्याने आपला आत्मविश्वास वाढवला. आपल्या अंतर्मनाला ‘मी पूर्णपणे पहिल्यासारखा बरा होऊ शकतो, या आजारातून मला लवकरात लवकर मुक्त व्हायचे आहे.’ अशा प्रकारच्या स्वयंसूचना देऊन अत्यंत आत्मविश्वासाने हळूहळू या आजारातून बाहेर पडला. फिजिओथेरपीच्या सहाय्याने शारीरिक व्यायामाला सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे काही महिन्यांतच तो या जीवघेण्या आजारातून सहीसलामत बाहेर पडला.
जगातील मानसशास्त्रज्ञ, ऋषीमुनी यांनी स्वतच्या मनाच्या ताकदीबद्दल बरेच काही सांगितले आहे. ‘जे जे म्हणून अंतर्मनात किंवा सुप्त मनात, ते ते अनुभवायला मिळते’ हाच मानवी जीवनातील मोठा नियम सांगितला आहे. अनेक यशस्वी व्यक्तींचा जवळून अभ्यास केला तर आपणास अंतर्मनाच्या ताकदीचा प्रत्यय दिसून येतो. शिवाय प्रचंड आत्मविश्वास निर्माण करायचे फार मोठे काम हे अंतर्मनच करीत असते. प्रचंड आत्मविश्वासामुळे अशा व्यक्ती अपयशाकडून यशाकडे झेप घेतात, आणि इतरांनाही प्रेरणादायी ठरतात!