परीक्षण- सामाजिक बांधिलकीचा मुक्ताविष्कार

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

‘मी आता गप्प बसणार नाही,..
कवितेच्या वाटेला गेल्याशिवाय राहणार नाही…!’

असं ठामपणे सांगून ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रसेन टिळेकर यांनी ‘कवितेच्या वाटेला’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून सामाजिक दंभावर प्रहार केला आहे. टिळेकर यांनी आजवर वैज्ञानिक, वैचारिक, ललित या साहित्य प्रकारात एकूण 22 पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांनी विनोदी कथा, शृंगारिक कथा, एकांकिका संग्रह, विनोदी लेख संग्रह यांसारख्या साहित्याच्या माध्यमातून विविधांगी लिखाण केले आहे. काव्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रथमच पदार्पण केले आहे. असे असले तरी समाजातील वाईट तसेच कालबाह्य रुढी-परंपरा, वेडगळ समजुती यावर त्यांनी आपल्या कवितेतून आसूड मारले आहेत.

चंद्रसेन टिळेकर यांचा मूळ पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. त्यांनी तारुण्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. त्यानंतर मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱया शिवसेनेच्या कार्यात झोकून दिले. शिवसेनेच्या भायखळा शाखेचे ते शाखाप्रमुख होते. 1996 साली पार्ल्यात ‘अत्रे कट्टा’ स्थापन केला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात झोकून दिले. त्यांनी आपल्या दीर्घ व सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीचा मुक्ताविष्कार ‘कवितेच्या वाटेला’ या पुस्तकातून मांडत मार्मिकपणे सामाजिक दंभावर बोट ठेवले आहे.

यातील सर्व कविता मुक्तछंदातील आहेत. या कवितांमधून समाजातील अनेक प्रश्न मांडले आहेत. सामाजिक भान जागृत करून एक विधायक संदेश दिला आहे.

चांदणं सुखाचं असलं,
तरी ते सूर्याचं उसनं असतं…

दुसऱयाला प्रकाश देणं, हेच तर खरं जिणं असतं’ अशा सकस विचारांची ते पानोपानी पेरणी करतात. टाळ, मृदुंग, प्रवचन, धर्म, योग, सिद्धी, मोक्ष, परमार्थ, साधना, उपासना, ईश्वर, विधाता, नामस्मरण, सनातन, परंपरा या धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींचा उहापोह करीत टिळेकर यांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रधर्म, त्याग, समर्पण, शौर्य, संस्कृती, संस्कार, अस्मिता, लढा यांचे अनन्यसाधारण महत्त्वही विशद केले आहे. सद्यस्थितीत समाजस्वास्थ्य बिघडवणारी खंडणी, वर्गणी, खून-खराबा, चाकू-सुरी, दादा, भाई, नेता, राडा यासारख्या बाबींची दाहकता व्यक्त केली आहे.

‘बा तुकोबा’ या कवितेत ‘…हवा तुझा विचार – सोटा, हाणा या खोटय़ांच्या माथा’ या शब्दात तुकोबारायांच्या विचारांचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. ‘डबकं’ या कवितेत ज्योतिबा, सावित्री, रं.धों. कर्वे, गाडगेबाबा यांचे विचार कसे आज पायदळी तुडवीत आहेत याचा परामर्श घेतला आहे. उद्याच्या मातांनो, पिसाटलेले दुःशासन, रघुनाथ धोंडो कर्वे यांसी, एक जळण जळणं, तुझे हात, सावित्रीच्या लेकी, आई बहिणाई, महाराष्ट्राचे शिल्पकार, पुण्यात दिसल्या सावित्रीबाई! या कवितेतून स्त्राr शिक्षण व स्त्रियांच्या समस्या याविषयीचे मूलगामी विचार मांडले आहेत. आम्ही आणि ते, पळा पळा कोण पुढे पळे तो, दार उघड बये… विज्ञानेश्वरी, आळंदीची भिंत, पालथी घागर या कवितेत अंधश्रद्धा, तीर्थयात्रा, पूजाअर्चा, नवससायास, कर्मकांडे यासंदर्भात कवीने पोटतिडकीने लिहिले आहे.

कवी डॉ. महेश केळुसकर यांची छोटेखानी प्रस्तावना आहे. ते म्हणतात, ‘ग’ लिहायला जावं तर गर्व धर्माचा थैमान घालत येतो. अशी नवी बाराखडी प्रचलित झालेली पाहून कवी अस्वस्थ होतो. आपलीच घरे भरणारे लोक महत्त्वाकांक्षांची शर्यत लावताना पाहून हताश होतो, पण जोवर कवीच्या जिवात जीव आहे तोवर तो सनातनी डबक्यांवर हल्ला करत राहणार…!’’ हे टिळेकर यांच्या सामाजिक प्रबोधनातील योगदान मौलिक असल्याचे जणू प्रशस्तीपत्रच देतात. टिळेकर यांच्या कविता या वास्तववादी सामाजिक उर्मीतून आल्या आहेत, हे अधोरेखित होते.

एकूणच या कविता सामाजिक सुरक्षा आणि सुधारणा या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱया लढावू कार्यकर्त्यांना अधिक बळ देतील.

कवितेच्या वाटेला- चंद्रसेन टिळेकर
प्रकाशक- सायली क्रिएशन्स
पृष्ठे- 92, मूल्य- 100/-

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)