मराठी साहित्यातील व्यासंगी व परखड समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना यंदाचा प्रतिष्ठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘विंदांचे गद्यरूप’ या समीक्षात्मक पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला. एक लाख रुपये, ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 8 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका भव्य समारंभात त्यांना पुरस्कार प्रदान केला जाईल.
साहित्य अकादमीच्या वतीने वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार 2024 ची बुधवारी घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये आठ काव्यसंग्रह, तीन कादंबऱया, दोन कथासंग्रह, तीन निबंध, तीन साहित्यिक समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक पुस्तकाचा समावेश आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव काwशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांना मान्यता देण्यात आली. पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. मराठी भाषेच्या पुरस्काराच्या निवड समितीत हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके, विद्या देवधर होते. काsंकणी भाषेचा पुरस्कार मुकेश थळी यांच्या ‘रंगतरंग’ या लेखसंग्रहाला मिळाला.
पुरस्कारामुळे आनंद झाला असून आतापर्यंतचा हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार असल्याची प्रतिक्रिया सुधीर रसाळ यांनी दिली. ‘हा देशातील सन्मानाचा पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्काराने मला समाधान मिळवून दिले. मोठेमोठे समीक्षक, विचारवंत यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यामुळे मोठ्या माणसांबरोबर आपणही या पुरस्काराचे मानकरी झालो. याचा एक विशेष आनंद असतो,’ असे रसाळ म्हणाले.
नव्वदीतही लेखन
91 वर्षीय सुधीर रसाळ म्हणजे मराठीतील अग्रगण्य समीक्षक. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडवणारे मराठी भाषेचे शिक्षक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापक म्हणून त्यांची प्रदीर्घ कारकीर्द संस्मरणीय आहे. ते अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषद, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले. त्यांचा ‘कविता आणि प्रतिमा’ हा काव्यविषयक मीमांसा ग्रंथ गाजला. वयाच्या नव्वदी ओलांडल्यानंतर त्यांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या 16 व्या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यांना समीक्षेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाचा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार त्यांना मिळाला आहे.