मल्टिवर्स – थरारक अनुभव

>> डॉ. स्ट्रेंज

जे काही आपल्याला दिसते, जाणवते ते किती फसवे असू शकते, आपले रोजचे आयुष्य हे खरे भासणारे, पण किती खोटे असू शकते याचा रोमांचक अनुभव ‘आबिवियन’ हा चित्रपट आपल्याला देतो.

2013 साली जोसेफ कोसिन्स्कि या दिग्दर्शकाचा Oblivion हा चित्रपट म्हणजे एक थक्क करणारा अनुभव आहे. जे काही आपल्याला दिसते, जाणवते ते किती फसवे असू शकते, आपले रोजचे आयुष्य हे खरे भासणारे, पण किती खोटे असू शकते याचे रोमांचक चित्र हा चित्रपट आपल्यासमोर सादर करतो. साय फाय प्रकारात मोडणाऱया या कथेला मोर्गन फ्रीमन, टॉम क्रुझ अशा दिग्गज अभिनेत्यांची समरसून साथ लाभली आहे.

चित्रपटाची कथा 2077 सालात सुरू होते. पृथ्वीवर आता फक्त दोन मानव नांदत आहेत, एक जॅक हार्पर (टॉम क्रुझ) आणि त्याची साथीदार प्रेमिका व्हिक्टोरिया. 2017 साली स्कॅव्हेंजर्स म्हणवल्या जाणाऱया एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केलेला असतो. सर्वात आधी ते चंद्राला नष्ट करतात. त्यामुळे पृथ्वीवर त्सुनामीसारख्या अनेक भयानक आपत्ती कोसळतात. अखेर परमाणू हल्ल्याच्या मदतीने मानव हे युद्ध जिंकतात, मात्र या सगळ्यात पृथ्वी मात्र माणसाला राहण्यासाठी अनुकूल राहत नाही. शेवटी वाचलेले सर्व मानव शनीच्या सगळ्यात मोठ्या चंद्रावर अर्थात टायटनवर टेट नावाचे एक अंतराळस्थान उभारतात आणि तिकडे प्रयाण करतात.

मानवाला टायटनवर राहण्यासाठी अनुकूल वातावरणाची गरज असते. हे वातावरण निर्माण करण्यासाठी ते फ्युजन एनर्जीचा वापर करत असतात. या फ्युजन एनर्जीसाठी पृथ्वीवर समुद्रामध्ये मोठमोठे हायड्रोथर्मल प्लांट बसवलेले असतात, जे समुद्राच्या पाण्यापासून फ्युजन एनर्जी बनवत असतात. या हायड्रोथर्मल प्लांट्सना अजूनही पृथ्वीवर लपून बसलेल्या काही स्कॅव्हेंजर्सपासून धोका असतो. त्यामुळे या प्लांट्सच्या रक्षणासाठी अत्याधुनिक असे ड्रोन सतत गस्त घालत असतात. या ड्रोन्सचे मुख्य काम प्लांट्सची रक्षा करणे आणि स्कॅव्हेंजर्सला ठार मारणे हे असते. या ड्रोन्सची रक्षा करणे, त्यात बिघाड झाल्यास त्वरेने दुरुस्त करणे ही जबाबदारी जॅक हार्परवर असते आणि त्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी व्हिक्टोरियावर असते.

पृथ्वीवर येण्याआधी म्हणजे पाच वर्षांपूर्वी जॅक आणि व्हिक्टोरिया यांची स्मृती पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली असते, मात्र जॅकला त्याच्या भूतकाळातील घटना, खासकरून एक स्त्राr वारंवार स्वप्नात दिसत असते. जॅक त्यामुळे थोडा अस्वस्थ असतो. एकदा ड्रोन दुरुस्तीच्या कामगिरीवर असताना जॅकला अवकाशातून एक वस्तू खाली कोसळताना दिसते. जॅक त्वरेने तिथे धावतो. ती वस्तू म्हणजे अवकाशयानाचा एक भाग असतो आणि त्यामधून अनेक स्लिपिंग पॉड्स खाली विखुरलेले असतात. या पॉड्समध्ये माणसांना पाहून जॅक चमकतो. त्यातील एका पॉडमध्ये त्याला त्याच्या स्वप्नात येणारी तरुणी दिसते आणि तो आश्चर्याने थक्क होतो.

जॅक स्वतःला सावरणार तेवढ्यात तिथे काही ड्रोन्स हजर होतात आणि ते हल्ला करून त्या पाड्सना आतील माणसांसकट नष्ट करतात. जाक मोठ्या हुशारीने त्या तरुणीला वाचवतो आणि आपल्या निवासस्थानावर घेऊन येतो. हे निवासस्थान स्कॅव्हेंजर्सच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी जमिनीपासून खूप उंचावर बांधलेले असते. स्लिपिंग पॉडमधील तरुणी आता शुद्धीवर येते. ती जॅक आणि व्हिक्टोरिया दोघांकडे पाहून चमकते. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ती 60 वर्षांपूर्वी नासाच्या शनी मोहिमेवर गेलेली असते. 60 वर्षे ती निद्रावस्थेत असताना पृथ्वीवर काय काय घडले हे ऐकल्यावर तिला मोठा धक्का बसतो. मात्र आपल्या यानातील फ्लाइट रेकॉर्डर काही करून तिला मिळवायचा असतो. पण त्यासाठी पुन्हा खाली जाणे गरजेचे असते. व्हिक्टोरिया त्याला नकार देते. कारण बरीच रात्र झालेली असते. जॅक मात्र तिच्या हट्टापुढे मान टेकवतो आणि गुपचूप तिला घेऊन जमिनीच्या दिशेने झेपावतो. ही जमिनीची भेट त्याला आयुष्यातला सर्वात थक्क करणारा अनुभव ठरते. या भेटीत तो दुसऱया जॅक हार्परला अर्थात त्याच्या क्लोनला भेटतो आणि काही मानवांनादेखील. आता जॅकपुढे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण नक्की कोण आहोत हे त्याला समजेनासे होते.

जॅक नक्की कोण असतो? त्याला सापडलेली तरुणी कोण असते? स्कॅव्हेंजर खरे कोण असतात? जॅकचा क्लोन कोणी आणि का बनवलेला असतो? तो जॅक जे काम करतो आहे तेच पृथ्वीच्या दुसऱया भागात का करत असतो? या प्रश्नांची उकल करण्यासाठी आणि उत्तरांचा रोमांचक प्रवास अनुभवण्यासाठी Oblivion बघायला हवा.