विशेष – मंकी पॉक्सचं जागतिक संकट

>> डॉ. संजय गायकवाड

`मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य संसर्गाचा जगात वेगाने फैलाव होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गंभीर इशारा दिला. कांगोसह अन्य तीन देशांत आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. `डब्ल्यूएचओ’ने आफ्रिकेत मंकी पॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे  आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून मंकी पॉक्स आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू शकतो, असा इशाराही दिला आहे. मंकी पॉक्स संसर्ग 1958 पासून अस्तित्वात आहे. 1970 मध्ये हा मनुष्यप्राण्यात पसरू शकतो, हे जगाला कळले. कालपरत्वे हा आजार वाढत जात आता हिंदुस्थानपर्यंत पोहोचतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आधीच झिका विषाणूच्या आजाराची भीती पसरत चालली आहे. तशातच हे नवसंकट चिंता वाढवणारे ठरत आहे.

`मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य संसर्गाचा जगात वेगाने फैलाव होत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गंभीर इशारा दिला. कांगोसह अन्य तीन देशांत आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. `डब्ल्यूएचओ`ने आफ्रिकेत मंकी पॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे  आरोग्य आणीबाणी जाहीर केली असून हा संसर्ग आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू शकतो, असे म्हटले आहे. `डब्ल्यूएचओ’चे संचालक जनरल टेड्रोस अधानोम घेबेरयुसेस यांनी संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीनंतर मंकी पॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या. तत्पूर्वी आफ्रिकी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) खंडात वाढत्या मंकी पॉक्समुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केली होती.

चालू वर्षी आफ्रिकेत मंकी पॉक्सचे 14 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून त्यात 524 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. आतापर्यंतच्या एकूण प्रकरणांतील 96 टक्क्यांहून अधिक रुग्ण आणि मृत्यू कांगोत झाले आहेत. शिवाय या ठिकाणी नव्या प्रकारचा मंकी पॉक्स पसरत असून तो सहजपणे प्रसार करत असल्याबद्दल शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.

मंकी पॉक्सचे स्वरूप काय? 

एम पॉक्सला अगोदर मंकी पॉक्सच्या नावाने ओळखले जात होते. ब्राझीलमध्ये 2022 मध्ये या कारणांमुळे असंख्य माकडांची सामूहिक हत्या करण्यात आली. माकडांमुळे हा संसर्ग पसरत असल्याची अफवा पसरल्याने हकनाक माकडांचे बळी गेले. त्याचा इतिहास पाहिला तर हा संसर्ग पहिल्यांदा सहा दशकांपूर्वी (1958) आढळून आला. तो माकडांत कांजिण्यासारखा पसरत होता. अलीकडच्या काळापर्यंत मंकी पॉक्सची बहुतांश प्रकरणे मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या लोकांतच आढळून आली आणि प्रामुख्याने बाधित प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये आढळून आली. 2022 मध्ये एम पॉक्स संसर्ग हा लैंगिक संबंधातून पसरत असण्याच्या वृत्ताला वैद्यकीय विभागाकडून दुजोरा मिळाला आणि सत्तरपेक्षा अधिक देशांत त्याचा उद्रेक झाला. यापैकी बहुतांश देशांत एम पॉक्सचे रुग्ण आढळून आलेले नव्हते. एम पॉक्स हा कांजिण्यासमान संसर्गासारखा असून त्याची लक्षणे फारशे गंभीर नसतात. यात ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी यांचा समावेश आहे. गंभीर प्रकरणात चेहरा, हात, छाती, मांडी यावर लालसर व्रण दिसतात. 2022 मध्ये हिंदुस्थानातही काही जणांत मंकी पॉक्सची लक्षणे आढळून आली.

हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकी पॉक्सचा संसर्ग हा प्रामुख्याने  थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडय़ांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकी पॉक्सचा संसर्ग हा प्रामुख्याने  थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडय़ांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीशी संपर्क आला तर श्वसनमार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे  होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्राण्यांपासून माणसालाही मंकी पॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

हिंदुस्थानात मंकी पॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करून आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे,  सुजलेल्या लसिका ग्रंथी,  ताप, डोकेदुखी, अंगदुखी,  प्रचंड थकवा, घसा खवखवणे आणि खोकला  अशी लक्षणे दिसून आली आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत काही गाइडलाइन्स जारी केल्या गेल्या आहेत. त्यानुसार संशयित मंकी पॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे,  रुग्णांच्या कपडय़ांशी अथवा अंथरुणपांघरुणाशी संपर्क येऊ न देणे,  हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थांमध्ये मंकी पॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे यांचा समावेश आहे.

आफ्रिकेत सर्वाधिक प्रसार कशामुळे? 

गेल्या आठवडय़ात आफ्रिकी सीडीसीच्या एका अहवालानुसार एम पॉक्स किमान तेरा देशांत आढळून आल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीचे आकलन केल्यास या प्रकरणात 160 टक्क्यांनी आणि मृतांच्या प्रमाणात 19 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. शास्त्रज्ञांनी या वर्षी कांगोतील एका खाणक्षेत्रात एम पॉक्सचे नवे रूप पाहिले. हा नवा विषाणू बाधित झाल्यास जवळपास दहा टक्के लोकांच्या जिवावर बेतू शकतो आणि सहजपणे पसरू शकतो. या नव्या स्वरूपाच्या मंकीपॉक्सची लक्षणे किरकोळ असून त्यामध्ये केवळ मांडीवर लालसर व्रण दिसतात. परिणामी, त्याचे निदान करणे कठीण जाते आणि बाधित लोकांकडून अप्रत्यक्षपणे प्रसार केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एम पॉक्स हा अलीकडच्या काळात आफ्रिकेतील बुरुंडी, केनिया, रवांडा, युगांडा या चार देशांत आढळून आला. अर्थातच या देशांतील प्रसार कांगोमुळे झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यामागचे कारण म्हणजे संबंधित देशांना जागरुक करणे आणि कारवाईसाठी प्रेरित करणे.

मागच्या आरोग्य आणीबाणीबाबत जगात उमटणाऱ्या प्रतिािढया संमिश्र होत्या. आफ्रिकी सीडीसीचे संचालक जनरल डॉ. कासेंया यांच्या मते, आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यामागचा उद्देश संस्था, सामूहिक इच्छाशक्ती अणि स्रोतांना तातडीने कारवाई करण्यासाठी प्रेरित करणे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्रोफेसर मायकेल मार्कस यांच्या मते, आरोग्य आणीबाणी लागू केल्याने तातडीने हालचाली होत असतील तर तो निर्णय योग्य आहे.

2022 पेक्षा वेगळे काय? 

2022च्या जागतिक उद्रेकाच्या काळात बहुतांश प्रकरणे ही समलैंगिक संबंधाची होती. परिणामी हा आजार केवळ लैंगिक संबंधामुळेच पसरत असल्याचा समज सर्वत्र निर्माण झाला. अर्थात आफ्रिकेत काही प्रकरणांतील लक्षणे सारखीच आढळून आली होती. मात्र कांगो येथे पंधरा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना होण्याची शक्यता 70 टक्के आणि मृतांसाठी हा आजार 85 टक्के कारणीभूत असल्याचे कळून चुकले.

डॉ. ट्रेडोस म्हणाले, बहुतांश देशांना एम पॉक्सचा सामना करावा लागत आहे. त्यात संसर्गाचे विविध प्रकार आणि संभाव्य धोक्याच्या पातळीचा समावेश आहे. 2022 मध्ये अनेक देशांनी एम पॉक्सचा उद्रेक रोखण्यासाठी लसी आणि उपचारांचे प्रभावी हत्यार वापरले, परंतु आफ्रिकेत आरोग्यांची साधने अपुरी आहेत. एम पॉक्सला पायबंद घालण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरू शकते. यात कांजिण्यासारख्या पसरणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लसीचा समावेश आहे. कांगोमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी दानशूरांशी चर्चा केली जात आहे. तसेच ब्रिटन आणि अमेरिकेकडून आर्थिक साह्य पाठविण्यात आले आहे.

सिरम इन्स्टिटय़ूटनेही एम पॉक्सवर लसनिर्मितीबाबत प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रिकेत एम पॉक्सचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन फंडामधून 1415 लाख डॉलर मंजूर केले. मात्र प्राथमिक पातळीवर मुकाबला करण्यासाठी आणखी निधीची गरज भासू शकते. मंकी पॉक्स संसर्ग 1958 पासून अस्तित्वात आहे. 1970 मध्ये तो मनुष्यप्राण्यात पसरू शकतो हे जगाला कळले. कालपरत्वे हा आजार हा कधी वाढला तर कधी कमी झाला, पण तो पश्चिम आणि मध्य आफ्रिकेपर्यंतच मर्यादित राहत होता. आता तो इतरत्र पसरला आहे. `मंकी’ हा शब्द प्रथमदर्शनी लक्षणांशी संबधित वाटतो, परंतु माकड आणि  संसर्ग यांचा एकमेकांशी काही संबंध नाही.

`जर्मन सोसायटी फॉर इम्युनॉलॉजी’चे प्रमुख ख्रिस्तीन फाक म्हणतात, 1958 मध्ये हा आजार पहिल्यांदा माकडात आढळून आल्याने त्याला मंकी पॉक्स म्हटले जाते. मात्र हा आजार केसाळ प्राण्यापांसून पसरतो. चिंपाझीत आढळून येणारे अॅडिनोव्हायरस, एडिनोव्हायरस, कांजिण्या यांसारख्या संसर्गापेक्षा मंकी पॉक्स हा अतिशय वेगळा असून तो वेगळ्या श्रेणीतील संसर्ग आहे आणि त्याची लक्षणेही भिन्न आहेत.

तूर्त तरी या संसर्गाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला नसला तरी आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

(लेखक वैद्यकीय तज्ञ आहेत)