सृजन संवाद – सीतेने सांगितलेली गोष्ट

>> डॉ. समिरा गुजर-जोशी

वाल्मीकी रामायणातील सीता नेमकी कशी आहे असे कुतूहल अनेकांना वाटते. आज या पूर्ण प्रश्नाचा वेध घ्यायचा नसला तरी श्रीराम आणि सीता यांच्यामधील असा एक संवाद आपण पाहणार आहोत, ज्यामुळे वाल्मीकी रामायणातील सीता समजून घेणे आपल्याला सोपे जावे. सीता ही अतिशय हुशार, स्वतची प्रज्ञा असणारी विदुषी आहे. कोणत्याही परिस्थितीत ती विवेकाने विचार करणे सोडत नाही. ती फार मुद्देसूद बोलू शकते. किंबहुना ती उत्तम वक्ता आहे. तिचे म्हणणे सौम्य शब्दात पण ठामपणे मांडणे तिला अवगत आहे. हे खरे तर फार दुर्मिळ कौशल्य आहे. सहसा आपले म्हणणे पटवून देताना लोक आरडाओरडा करतात, समोरच्याला दोष देतात, माझे तेच खरे असे ठासून सांगतात. सीता मात्र आपले संतुलन ढळू देत नाही. अरण्यकांडातील या प्रसंगातही तिला रामाच्या वागण्यावर बोट ठेवायचे आहे. त्याचा एक निर्णय तिला पटलेला नाही. त्याने त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असे तिला मनापासून वाटते आहे. अशावेळी पती-पत्नीच्या नात्यात सहज तणाव निर्माण होऊ शकतो. पण अशी नाजुक परिस्थिती ज्या प्रगल्भतेने सीतेने हाताळली आहे यातून खूप शिकण्यासारखे आहे. आधी हा संवाद का घडला हे समजून घेऊ.

श्रीरामांनी त्यांना वनवासात भेटलेल्या ऋषींना असे वचन दिले की, तपस्वी ऋषींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा मी युद्धात निपात करेन. रामांनी ही प्रतिज्ञा केल्यानंतर सीतेला राहावले नाही. ती अतिशय नम्रपणे पण ठामपणे त्यांच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तिचे म्हणणे आहे की, सूक्ष्मदृष्टय़ा पाहिले तर आपल्या हातून हा राक्षसांचा बंदोबस्त करण्याचा जो निर्णय आहे तो वस्तुत अधर्म घडविणारा आहे. कोणीही सुज्ञाने ‘कामज’ अर्थात काम म्हणजेच मोहातून उद्भवणाऱ्या संकटांपासून दूर राहावयास हवे. (संस्कृतमध्ये संकटाला समानार्थी शब्द व्यसन असा आहे. एखाद्याला एखादे व्यसन असणे हे संकटच आहे. म्हणजे मराठीत तो काहीसा संकुचित अर्थाने रूढ झाला आहे असे म्हणूया.) तर, अशी कामातून संभवणारी व्यसने किंवा संकटे कोणती? सीतेने ती नेमकी सांगितली आहेत की, जेव्हा एखादी व्यक्ती मोहवश असते तेव्हा ती एक तर खोटे बोलते, दुसरे म्हणजे परस्त्राrचा मोह ठेवते किंवा तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अकारण कोणाशी वैर स्वीकारते. यापैकी काहीही घडले तरी त्या व्यक्तीची अधोगती होणार हे निश्चित!

मोह म्हणजे एकप्रकारची धुंदीच म्हणा ना. अशा धुंदीत राहून वरील तीनही चुका करणाऱ्यांची उदाहरणे आपल्या अवतीभवती किती तरी पाहावयास मिळतील. सीता म्हणते, रामा तू सत्यवचनी आणि एकपत्नी व्रत पाळणारा असल्यामुळे पहिल्या दोन गोष्टी तुझ्या हातून घडणार नाहीत हे मला खात्रीशीररीत्या ठाऊक आहे. तू खोटे बोलणार नाहीस किंवा तुला परस्त्राrचा मोह होणार नाही. मला भीती आहे ती तिसऱ्या कामज संकटाची. एखाद्याशी कारण नसताना वैर घेण्यात शहाणपणा तरी कोणता? ज्याने आपले वैयक्तिक नुकसान केले आहे त्याच्याशी आपण स्वाभाविकपणे शत्रुत्व पत्करतो, पण ऋषीमुनींच्या सांगण्यावरून तुम्ही राक्षसांशी युद्ध करावे हे कितपत योग्य आहे? राक्षसांनी आपले नुकसान केलेले नसताना आपण त्यांच्याशी का लढायचे? ‘विना वैरं च रुद्रता’ – ही संयुक्तिक नाही असे तिचे मत आहे. राक्षसांना ठार मारायला तिचा विरोध का हे कदाचित चटकन आपल्या लक्षात येत नाही. याचे स्पष्टीकरण माधवराव चितळे यांनी आजच्या काळातील उदाहरण देऊन दिले आहे. ते म्हणतात, आजच्या काळातही आतंकवादाने आपल्याला वेढलेले असताना सैनिकाशेजारी उभी असणारी व्यक्तीदेखील आतंकवादी आहे की नाही हे ओळखणे इतके सोपे नाही. मग राम तरी राक्षस ओळखणार कसा? कारण ते बहुधा सर्वसामान्य रूपात फिरतात. (शूर्पणखा ही राम-लक्ष्मणांना सुंदर वेषात भेटली होती.) तिचा विरोध सरसकट सगळे राक्षस मारेन या प्रतिज्ञेला आहे.

तिच्या आक्षेपाचा हा प्रसंग वरवर पाहता फारसा महत्त्वाचा वाटत नाही, पण तो नीट समजून घेतला तर रामायणात अरण्यकांडाचे महत्त्व काय आहे हेही ध्यानात येते. वाल्मीकींनी किती सहजपणे हा संवाद सीतेकरवी घडवून आणला आहे. हा संवाद ते लक्ष्मणाकरवी पण घडवू शकले असते, पण ते तसे करत नाहीत. राक्षसकुळाचा कारण नसताना संहार करू नका असे ज्या सीतेचे म्हणणे आहे त्याच सीतेचे अपहरण होते आणि हा संहार घडण्याचे कारण निर्माण होते. यासाठी अरण्यकांड अतिशय महत्त्वाचे कांड ठरते. सीतेचा विरोध केवळ स्त्राrसुलभ काळजीतून आलेला नाही, तर ती काही महत्त्वाचे मुद्दे मांडते. तुम्ही जरी शस्त्रधारी योद्धा आहात आणि अडचणीत असणाऱ्यांचे रक्षण करणे हे तुमचे कर्तव्य असले तरी आज आपण वनवासी आहोत. अशा वेळी आपण वनात तापस वृत्तीने राहावे की शस्त्र धारण करावे हाच मुळात तिला पडलेला प्रश्न आहे. वनात प्रवेश करताना राजाने शस्त्र खाली ठेवावे असा संकेत होता. त्यामुळे तिला हा प्रश्न पडला आहे. शस्त्र धारण करणे हे आग जवळ बाळगण्यासारखे आहे.

याचसंदर्भात तिने एका ऋषींची गोष्ट सांगितली आहे. आज अमेरिकेत नागरिकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार आहे. त्याचे  अनेकदा गंभीर दुष्परिणाम बघायला मिळतात. त्यादृष्टीने सीतेने सांगितलेली गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. ती गोष्ट कोणती आणि सीतेच्या प्रश्नाला रामाने काय उत्तर दिले ते पुढील लेखात पाहू.

[email protected]

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)