>> डॉ. समिरा गुजर जोशी
लंका दहनानंतर हनुमंताचे रामाकडे परत जाणे, पुढील युद्धाची तयारी, वानरांनी समुद्रावर सेतू बांधणे याविषयी आपल्याला पुरेशी माहिती असते. पण याच वेळेस रावणाच्या छावणीत काय सुरू होते? हनुमंताने लंका जाळल्यानंतर, त्या घटनेचे पडसाद रावणाच्या दरबारात कसे उमटले, याविषयी सहसा आपल्याला वाचायला मिळत नाही. वाल्मीकी रामायणात मात्र याचा सविस्तर विचार केला आहे.
हनुमंताने लंकेची दुर्दशा केल्यानंतर रावण पुरता खजील झाला आहे. असे कधी होईल असा त्याने विचारही केला नव्हता म्हणून तो काहीसा हबकला आहे. आता पुढे काय करायचे हे सुचवण्यासाठी त्याने आपल्या सर्व अमात्यांना एकत्र बोलावले आहे. ह्या सभेला संबोधित करताना रावणाने चक्क राजनैतिक मुद्दय़ांचा गांभीर्याने विचार केला आहे. जगात उत्तम, मध्यम, अधम तीन प्रकारचे लोक असतात. जो मी एकटाच सगळे करीन असा विचार करतो तो अधम होय. जो सगळ्यांशी विचारविनिमय करून सगळ्यांना सोबत घेऊन जातो तो उत्तम पुरुष होय. रावणाचा हा विचार जरी बरोबर असला तरी तो पश्चातबुद्धी असल्यासारखा वाटतो. माणूस संकटात असल्यावर त्याला नीती आठवते तशाच प्रकारचा रावणाचा पश्चात्ताप वाटतो. सीतेचे अपहरण करण्याचा निर्णय त्याने घेतला तेव्हा तो मात्र एकटय़ानेच घेतला होता. त्यासाठी त्याने आपल्या मंत्रिमंडळाला विश्वासात घेतले नव्हते. आता मात्र या संकटातून स्वतला आणि लंकेला वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाने एकमताने निर्णय द्यावा असे त्याने सुचवले आहे. राम आणि रावण यांच्यामध्ये नेता म्हणून असलेला हा विरोधाभास महर्षी वाल्मीकींनी फार छान रंगवला आहे. रावणाने रामाची किती दहशत घेतली आहे हेही त्याच्या बोलण्यातून लक्षात येते. तो म्हणतो, मध्ये जरी समुद्र असला तरी राम तो समुद्र कोरडा करून किंवा काय वाटेल तो उपाय करून लंकेवर चढाई करणार हे निश्चित आहे, तेव्हा आता आपण काय करावे हे ठरवायला हवे. रामाचे सहाय्यक आणि रावणाचे सहाय्यक यांच्यातील विरोधाभासही इथे लक्षात येतो. रावणाचे सहाय्यक त्याला खऱया परिस्थितीची जाणीव करून देणारे नसून ते स्वतही गाफील आहेत. रावणाच्या हो ला हो करणं, किंवा त्याची खरी खोटी स्तुती करणे हेच त्यांचे धोरण असावे. या आधी रावणाने कोणत्या लढाई जिंकल्या आहेत याची त्याला आठवण करून देत त्या दरबारात त्याचे मंत्री उलटा सवाल करतात, की आपण इतके महापराक्रमी असताना आजच एवढी चिंता का बरे करत आहात? असे बोलणाऱया या मंत्र्यांपैकी कोणालाही एका हनुमंताला रोखणेही शक्य झाले नव्हते. आता तर हजारो वानरांचे सैन्य चाल करून येणार आहे! या आधी खर आणि दुषणाच्या सैन्याची एकटय़ा रामाने किती वाताहत केली हे ठाऊक असूनही अजूनही ते जागे झालेले नाहीत.
हनुमंताच्या बाबतीत जे झाले ते अचानक झाल्याने आम्हाला थोपवता आले नाही, असे बाळबोध कारणही हे मंत्री पुढे करतात. आता आपण सतर्क असल्यामुळे पुन्हा असे घडणार नाही याची हमी देतात.
एक मंत्री तर मी आत्ता जाऊन हनुमंताला नष्ट करतो, कारण त्याने राक्षस राज्याचा अपमान केला आहे, असेही सुचवतो. एक महत्त्वाकांक्षी कल्पना अशीही मांडली जाते की भरताकडून सैन्य आले आहे असे भासवून आपले सैन्य रामाच्या सैन्यात पेरायचे म्हणजे त्याचा पराभव करणे सोपे जाईल. आकाशमार्गाने त्या सैन्यावर आक्रमण करावे, अर्थात एअर अटॅक करावा ह्याचीही चर्चा होते. या सगळ्या कल्पना ऐकताना चमकदार वाटतात यात शंका नाही. पण ही उत्तम यंत्रणा नव्हे. चांगली योजना ही मूलभूत विचार करून आकारास येते. या सभेत जेव्हा बिभीषण बोलायला उभा ठाकतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन विवेकपूर्ण विचार करणे म्हणजे काय असते. ही सगळी उलट सुलट चर्चा सुरू असताना बिभीषण बोलायला उभा राहतो. तो सुरुवातच या मुद्दय़ाने करतो की कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद हे चार उपाय सांगण्यात आले आहेत. त्यापैकी दंड अर्थात युद्ध करणे हा उपाय आधीचे तीन उपाय थकले तरच करावयास हवा. अपरिहार्य असेल तरच युद्ध करावे. मग आपण थेट युद्धाची भाषा का करतो आहोत. हा योग्य मुद्दा समोर आल्याने सगळी सभा स्तंभित होते.
रामायणात भरताच्या भूमिकेविषयी फार बोलले जात नाही तसेच बिभीषणाकडेही काहीसे दुर्लक्ष होते. महर्षी वाल्मीकींनी मात्र या व्यक्तिरेखेला फार समर्थपणे उभे केले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या बिभीषणाला जाणून घ्यायचा प्रयत्न आपण पुढील लेखात करूया. बिभीषणाने रावणाला एक अगदी वेगळाच पर्याय सुचवला तो कोणता, हेही पुढील लेखात समजून घेऊ.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)