सृजन संवाद – रावणाचे खरे रूप

>> डॉ. समिरा गुजर जोशी

आजच्या लेखामध्ये रावणाविषयीच्या एका धक्कादायक पैलूचा परिचय करून घेऊया. जेव्हा जेव्हा आपल्याकडे स्त्राrवर काही अत्याचार होतो तेव्हा रामायणाचा संदर्भ मनामध्ये जागा होतो. अलीकडच्या काळातील नराधमांचे वागणे पाहून यांना माणूस तरी कसे म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित होतो आणि मग राक्षस असूनही रावण सभ्य होता, त्याने सीतेवर बळजबरी केली नाही, या गोष्टीचा संदर्भ मनामध्ये जागा होतो

अलीकडच्या काळातील काही चित्रपटांतून तर रावणाचे उदात्तीकरण केलेले दिसते. पण वाल्मीकी रामायणातील चित्र अतिशय वेगळे आहे. रावणाचे सीतेशी वागणे तपासून पाहिले की तो उदात्त वगैरे नक्कीच नव्हता. शूर्पणखेच्या, बहिणीच्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी त्याने सीतेचे अपहरण केले असेही नाही. तो मुळातच स्त्राrलंपट होता. शूर्पणखेच्या प्रसंगामुळे त्याला सीतेविषयी माहिती मिळाली हे खरे.

जेव्हा रामाच्या संदर्भात सल्लामसलत करण्यासाठी रावण सभा बोलवतो, तेव्हा मी सीतेवर मोहित झालो आहे असे रावण भर सभेमध्ये सांगतो. असे सांगण्यात त्याला कोणताही संकोच वाटत नाही. इतकेच नाही तर त्याच्या सेनापतींमधील एक प्रमुख सेनापती महापार्श्व सभेमध्ये त्याला सल्ला देण्यासाठी उभा राहतो आणि म्हणतो, ’रावणा, तू असा बालिशपणे का वागतो आहेस? एखाद्या हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या घनघोर वनात प्रवेश करून मध मिळवल्यानंतर ते न पिता कोण बरं राहील? तूच सगळ्यांचा स्वामी आहेस. तेव्हा तुला कोणाची भीती? तू बिनधास्त बलाचा वापर करू शकतोस. सीतेच्या संमतीची वाट बघण्याची आवश्यकता काय? बलात् वर्तस्व – बळजबरी करून सीतेचा उपभोग घे.’

अशा प्रकारचा सल्ला भर दरबारात खुलेपणाने देणे यावरच रावणाच्या पक्षाची नैतिकता लक्षात येते. मुळात हे बोलणेच आपल्याला धक्कादायक वाटू शकते, पण रावणाचे त्यावरचे उत्तर तर अधिकच खळबळजनक आहे. आपण अजून सीतेवर बळजबरी का केली नाही याचा जणू खुलासा करत रावण म्हणतो, ’माझ्या आयुष्यात यापूर्वीही मी बलात्कार केले आहेत. अनेक स्त्रियांना हत्तीच्या पायाखाली कमळ तुडवावे तसे मी माझ्या ताब्यात ठेवले आहे.’ हे सारे तो फुशारकीने सांगतो आहे. यंदा मात्र सीतेच्या संदर्भात त्याने हे धाडस का केले नाही याचे कारण त्याच्याच तोंडून ऐकायला मिळते. त्याला त्याने तिचा छळ केला अशा स्त्राrकडून शाप मिळाला आहे की, यापुढे जर त्याने एखाद्या स्त्राrवर बलाचा वापर केला तर त्याचे डोके ठिकाणावर राहणार नाही आणि म्हणून तो त्या दिशेने जायला धजावत नाही.

या उद्गारांवरून स्पष्ट आहे की, रावण बलात्कारी पुरुष आहे असे तो स्वतच सांगतो.

एखादा पुरुष बुद्धिमान असेल, सामाजिक जीवनात यशस्वी असेल, समाजात त्याची प्रतिष्ठा असेल तरी तो नीतिमान असेलच याची खात्री देता येत नाही. आजही दुर्दैवाने समाजात हेच चित्र पाहायला मिळते. रावण त्याचेच उदाहरण म्हणता येईल. तो विद्वान आहे, शिवभक्त आहे. यावरून सीतेला आदराने वागवण्याएवढा नीतिमान असेल असे चित्र कुठे तरी उभे राहते. पण रावणाने सीतेचा आदर केलेला नसून तो त्याच्या भीतीपोटी त्याने घेतलेला पवित्रा होता. प्रत्यक्षात मात्र त्याचे संभाषण एखाद्या गुंडासारखे आहे. एका बाजूला तू माझी झालीस तर मी तुला किती थाटात ठेवेन असे आमिष तो देतो आहे. त्याच वेळेस तुला मी मुदत देतो आहे. त्या मुदतीत तू जर माझे ऐकले नाहीस तर तुझी खांडोळी खांडोळी करेन हेही तो बजावतो आहे.

रावणाचे खरे रूप जाणून घेत असताना गुन्हेगारी मानसिकता कशी असते हेही ध्यानात येते. इथे रावणाला शापाची भीती आहे, आजच्या काळातील गुन्हेगाराला शिक्षा होण्याची भीती असते. पण म्हणून बरेचदा तो गुन्हा करण्यापासून परावृत्त होत नाही. उलट अधिक पिळवणूक करतो. दडपशाही करतो. बिभीषण वगळता रावणाला योग्य सल्ला देणारे कोणीही नाही. उलट त्याच्या दोषांचेही गोडवे गायले जात आहेत. त्याने सीतेवर दडपण आणण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले आहेत. सीता मात्र या सगळय़ात ठामपणे उभी आहे. आजच्या मुलींसमोर ही खंबीर सीता यायला हवी. ती अश्रू गाळत असली तरी मनातून खचली नाही हे महत्त्वाचे, कारण दुर्दैवाने रावणाची मानसिकता आजही बदललेली नाही.

[email protected]

 (निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृतमराठी वाङमयाची अभ्यासक)