>> डॉ. समिरा गुजर जोशी
काही व्यक्तिरेखा अशा असतात की, त्या खूप महत्त्वाच्या असूनही त्यांच्याविषयी फार तपशील सांगितले जात नाहीत. त्या तशा गौणच राहतात. असेच काहीसे शत्रुघ्नाबद्दलदेखील म्हणता येईल. रामासह लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत हे चार बंधू. शत्रुघ्न हाही सुमित्रेचा मुलगा. म्हणजे लक्ष्मणाचा जुळा भाऊ. पण त्याचे आणि भरताचे साहचर्य अधिक दिसते. रामाची सावलीसारखा पाठराखण करणारा लक्ष्मण आपल्याला सुपरिचित. रामाच्या अनुपस्थितीत राज्य सांभाळणाऱया भरताचे कर्तृत्वही सगळ्यांना माहीत आहे. पण त्या तुलनेत शत्रुघ्नाबद्दल आपल्याला कुठे काय ठाऊक असते? म्हणूनच उत्तरकांडात येणारा शत्रुघ्नाच्या राज्याभिषेकाचा हा प्रसंग वेगळा म्हटला पाहिजे.
राम अयोध्येत परत आल्यानंतर सुविहित पद्धतीने रामराज्य सुरू झाले. एके दिवशी त्याच्या राजसभेमध्ये अचानक काही ऋषी आले. यमुनेच्या तीरावर राहणारे ते काही समस्या घेऊन आले होते. रामाने त्यांना काय अडचण आहे हे विचारले. त्यांनी सांगितले की, तू रावणाचे पारिपत्य केल्याचे ऐकून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. ज्याप्रमाणे दंडकारण्यात ऋषींवर आक्रमणे होत होती, ते करत असलेल्या यज्ञांमध्ये विघ्ने आणली जात होती तशीच परिस्थिती यमुनेच्या तीरावरही उद्भवली आहे. त्यांना लवण नावाचा असुर त्रास देत असे. तू जसे रावणाला पराभूत केले त्याचप्रमाणे या लवणालासुद्धा पराभूत करावे अशी प्रार्थना घेऊन ते आले होते. या लवणासुराकडे त्याच्या वडिलांपासून आलेला शिवाचा एक अतिशय प्रभावी असा भाला (शूल) होता. या भाल्याचे वैशिष्टय़ असे की, तो कोणावरही फेकला की त्या माणसाची राख करून तो परत लवणासुराच्या हाती येत असे. या दिव्य भाल्यामुळे त्याची ताकद इतकी वाढली होती की, तो कोणालाच जुमानेसा झाला होता.
प्रभू श्रीरामांनी त्या ऋषींना अभयदान दिले व मी त्या असुराचा बंदोबस्त करेन, असे वचनही दिले. कोण त्याला मारायला तयार आहे असा प्रश्न श्रीरामांनी राजसभेत उपस्थित केला. भरताने आपण हे कर्तव्य बजावू शकतो हे लगेचच सांगितले. पण त्याच वेळी शत्रुघ्नही उभा राहिला. भरताने गेली 14 वर्षे राज्य सांभाळले आहे. आत्ताच तो त्या जबाबदारीतून मोकळा झाला आहे. त्याने ही मोहीम हाती घेण्यापेक्षा मला ही जबाबदारी द्यावी, असे मत त्याने व्यक्त केले. श्रीरामांनी त्याचे म्हणणे मान्य केले, पण ते म्हणाले, ही मोहीम तू सांभाळायची. इतकेच नव्हे, तर तो प्रदेश जिंकून तेथील राज्यकारभार तू पाहावास असे मला वाटते. त्यासाठी आताच मी तुला अभिषेकही करणार आहे. म्हणजे ही मोहीम खरे तर अयोध्येच्या राज्याच्या विस्ताराची मोहीम आहे. पण श्रीराम शत्रुघ्नाला केवळ सेनापती म्हणून पाठवत नाही आहेत. तर त्या विस्तारित राज्याचे राज्यपद त्याला देत आहेत. आजच्या काळात असे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. उलट सगळे अधिकार आपल्या हातात ठेवण्याची धडपडच सर्वत्र दिसून येते.
शत्रुघ्नाने मात्र लगेच या प्रस्तावाचा स्वीकार केलेला नाही. “भरत थोरला असताना मी हे पद कसे स्वीकारू? मला अशा धर्मसंकटात टाकू नका,’’ असे त्याने सांगितले आहे.
प्रभू श्रीरामांनी विश्वासाने ही जबाबदारी त्याच्यावर सोपवली. त्याला लगेचच राज्याभिषेकही करवून घेतला. कारण हे राज्य त्याला आयते मिळणार नव्हते. लवणासुरासारख्या अतिशय ताकदवान असुराचा पराभव करूनच हे राज्य त्याला प्राप्त होणार होते. प्रभू श्रीरामांनी त्याला एक खास शस्त्र दिले. हे अतिशय संहारक असून अंतिम पर्याय म्हणून हे वापर असे सांगितले.
ह्या मोहिमेचे आणि शत्रुघ्न आणि लवणासुर यांच्यामध्ये झालेल्या द्वंद्वयुद्धाचे अतिशय सुंदर वर्णन उत्तरकांडात वाचायला मिळते. शेवटी रामाने दिलेल्या संहारक अस्त्राच्या सहाय्याने शत्रुघ्नाने त्या असुराचा पराभव केला. त्यानंतर प्रसन्न होऊन च्यवन ऋषींनी त्याला सांगितले की, तू वर माग. शत्रुघ्नाचे मोठेपण त्याने मागितलेल्या वरामधून कळते. तो म्हणाला, “लवणासुराचे वडील मधु यांनी वसवलेली मधुपुरी आता मी माझी राजधानी करणार आहे. एक सुंदर नगरी वसवण्यात मी यशस्वी होईन असा मला वर द्या.’’ त्याने या परिसराचा कायापालट केला. शूर सैनिकांच्या वस्त्या वसवल्या. गावे वसवली. शेतीचा विकास केला. लोकांना प्रोत्साहन देऊन व्यापार उदीम सुरू केला. एखाद्या भू-भागाचे पुनर्वसन कसे करावे याचे आदर्श वर्णन या निमित्ताने केले आहे. रामायणात या नगरीचे नवे नाव मधुरा असे आले आहे. ती आजची मथुरा नगरी होय. आजही मथुरेच्या जवळ असलेल्या माहुली नावाच्या गावामध्ये लवणासुराची गुहा आणि शत्रुघ्न मंदिर पाहावयास मिळते. शत्रुघ्नाची एक पराक्रमी राजा आणि उत्तम प्रशासक म्हणून ओळख खास म्हणायला हवी.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाची अभ्यासक)