सृजन संवाद – रावणाची कुळकथा

>> डॉ. समिरा गुजर जोशी

रावणाची कुलपरंपरा काय? याविषयी उत्तरकांडामध्ये चर्चा येते. रावण स्वतला पौलत्स्य म्हणवत असे. ते पुलत्सी हे ब्रह्मर्षी होते. रावण तर बोलून चालून राक्षस होता. त्याचे ह्या ब्रह्मर्षीशी नाते कसे संभवते ह्याचा उलगडा उत्तरकांडात होतो. पुलत्सी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तृणबिंदू नावाच्या विद्वानाच्या आश्रमात जाऊन राहू लागले.

सकृतदर्शनी ज्ञानाचा विस्तार करण्याकरता नवे आश्रम काढण्यासाठी मेरुपर्वताच्या पायथ्याशी जाऊन त्यांनी आश्रम स्थापन केला होता. हा मेरुपर्वत आफ्रिकेत सध्याच्या टांझानियामध्ये आहे. त्याचे नाव आजही मेरू असेच आहे. तिथे तृणबिंदू नावाचा कोणी विद्वान एक आश्रम आधीपासून चालवत असे. त्याच्याबरोबर हे पुलत्सी राहिले. या तृणबिंदूला एक कन्यका होती. पुलत्सी मुनी आपल्या अभ्यासात मग्न असायचे. तेथील ऋषिकन्यकांना नवीन आलेली व्यक्ती म्हणून पुलत्सींबद्दल कुतूहल होते. त्यात तृणबिंदूंची कन्यका होती. पुलत्सी अभ्यासात गढलेले असताना, ते वेदांचे पठण करत असताना ती ऐकत उभी राही. तिचे पुलत्सींकडचे आकर्षण वाढते आहे, हे लक्षात आल्यानंतर तृणबिंदूंनी स्वतच पुढाकार घेऊन पुलत्सींना विनंती केली की, `आपण मुद्दाम येथे आला आहात. आपण माझ्याकडून भिक्षा म्हणून माझ्या या गुणवान मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करा.’ अशा रीतीने पुलत्सी आणि तृणबिंदूंची कन्यका यांचा विवाह झाला. नंतर त्यांना मुलगा झाला. त्यांचा संसार चांगला झाला. एका बाजूला तृणबिंदूंच्या मुलीच्या पोटात असताना पुलत्सींचे वेदमंत्र हा मुलगा ऐकत असे. त्याचे नावच आपण विश्रवा म्हणजे ज्याने वेद ऐकले असे ठेवू असे त्यांनी ठरविले. तो नंतर ऋषिपरंपरेप्रमाणे व्रतस्थ होऊन वडिलांप्रमाणेच मोठा तापसी झाला. पुढे तो विवाहयोग्य झाल्यानंतर भारद्वाज ऋषींनी त्यांच्या देववर्णिनी नावाच्या कन्येशी त्याचा विवाह करून दिला. म्हणजे एका बाजूस पुलत्सींची व भारद्वाजांची ऋषिपरंपरा, त्यात राजर्षी तृणबिंदूंची कन्या ही विश्रवाची आई, तिचा अंश येऊन मिळाला. त्या विश्रवाचा मुलगाही सर्व ब्रह्मगुणांनी व तेजाने संपन्न होता. विश्रवाचा मुलगा म्हणून तो वैश्रवण या नावाने ओळखला जातो. आजच्या आपल्या परिभाषेमध्ये तो धनाध्यक्ष म्हणजे वित्तसंस्थेचा प्रमुख होईल अशी भविष्यवाणीच विश्रवाने केली. (गणपतीपुढे आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो त्यात “कामकामाय मह्यं वैश्रवणो ददातु’ असे म्हणतो. तिथे वैश्रवण म्हणजे कुबेर असा अर्थ होतो. कुबेरदेखील वैश्रवण आहे, कारण तो त्याच कुळातील आहे.)

वैश्रवणाने कठोर तप केले. त्याला इंद्र-वरुण-यम यांच्याप्रमाणे लोकपाल व्हायचे होते. त्याला ब्रह्मदेवाने वर दिला की, तू चौथा लोकपाल होशील. तू अक्षय निधीचा स्वामी होशील. त्याला त्यांनी प्रसिद्ध असे पुष्पक विमानही भेट दिले. या वराने तो आनंदित तर झाला, पण त्याच्या मनात नव्या संकल्पांचा जन्म झाला. त्याला असे वाटले की, आता मी एक नवी वस्ती वसवावी. एक अशी जागा जिथे सगळ्यांना सुख मिळेल. कोणीही दुःखी नसेल. त्याच्या वडिलांनीच त्याला सुचवले की, `तू लंकेत जा आणि तुझे हे कार्य साकार कर. तिथे पूर्वी राक्षस राहायचे. पण भगवान विष्णूंनी त्यांना तेथून हुसकावले आहे. आता लंका ओसाड आहे. तिथे जाऊन तू तिला समृद्ध कर.’ त्याप्रमाणे त्याने केले. तो पुष्पक विमानात बसून आपल्या आई-वडिलांना भेटायला मेरू पर्वताच्या प्रदेशात पुन: पुन्हा जात असे याचाही उल्लेख आहे. त्या विश्रवाचे खरेतर एक लग्न झाले होते, त्यातून त्याला असलेला मुलगा म्हणजे कुबेर. पण कैकसी या राक्षस कन्येचा त्याला उतारवयात मोह पडला. (लंकेत पुन्हा शिरकाव व्हावा म्हणून राक्षसांनी तिला मुद्दाम पाठवले होते.) त्याने तिच्याशी विवाह केला. यातून राक्षसी संतती निर्माण होईल याची त्याला भीती होती, पण मोहाचे पारडे जड ठरले. या विवाहातून त्याला दशग्रीव अर्थात रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि बिभीषण ही अपत्ये झाली.

पुढे दशग्रीव मोठा झाल्यावर त्याच्या आजोळच्या मंडळींनी त्याच्या मनात कुबेराविषयी कटुता निर्माण केली. तेव्हा मोठा असल्याने लंकेवर कुबेराचे राज्य होते. रावण `मी राक्षस असल्याने इथला मूळ रहिवासी आहे, म्हणून मला राज्य दे,’ असे म्हणू लागला. तेव्हा कुबेर वडिलांकडे सल्ला मागायला गेला. तोवर रावण इतका बलाढय़ झाला होता की कुबेराला वडिलांनीही सांगितले की तू लंका सोड आणि हिमालयाच्या बाजूला जा. त्यामुळे युद्ध न करता रावण लंकापती झाला. त्याने कुबेराचे पुष्पक विमानही बळकावले. (रावणावर विजय मिळवून त्याच विमानात बसून राम अयोध्येत आले तेव्हा त्यांनी ते विमान लंकेला परत पाठविले नाही, तर कुबेराला परत केले, असा उल्लेख रामायणात येतो तो याच कारणामुळे!)

अशाप्रकारे रावण पुलत्सीच्या कुळातील, कुबेराचा सावत्र भाऊ असून असा राक्षसी कसा याचे उत्तर आपल्याला उत्तरकांडात सापडते.

(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)