
>> डॉ. समिरा गुजर जोशी
भारतीय परंपरेत गोष्टींची रचना फार कौशल्याने केली जाते. त्यामध्ये मनुष्य स्वभावाचे विविध कंगोरे असतात. जगण्याविषयीचे अनुभव असतात आणि त्याचबरोबर निसर्ग घटनाही समावलेल्या असतात. यापैकी एक जरी पैलू यशस्वीपणे मांडता आला तर त्या गोष्टीची गणना उत्तम कथेमध्ये करायला हरकत नाही, पण कथाकार जेव्हा ऋषी वाल्मीकी असतात तेव्हा ते हे सगळे पैलू एकाच कथेतही आणू शकतात. आता ही कथा वाल्मीकींनी रचली की त्यांना परंपरेने ती ठाऊक झाली हा प्रश्न आहेच. पण तूर्त तरी आपण उत्कृष्ट कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे श्रेय वाल्मीकी ऋषींना देऊन पुढे जाऊ. तर ही कथा आहे राजा त्रिशंकूची.
राजा त्रिशंकू हा रामाच्याच ईश्वाकू कुळातील एक श्रेष्ठ राजा होता. त्याचे आचरण अतिशय उत्तम असून तो कधीही खोटे बोलत नसे. तो प्रजाहितदक्ष होता. त्याने अनेक यज्ञही केले होते. नाव ठेवण्यासारखे त्याच्यामध्ये काहीच नव्हते. पण त्याच्या मनात एका विचित्र इच्छेचा जन्म झाला. आपण ‘सदेह स्वर्गाला जावे’ असे त्याला वाटू लागले. त्याने आपले गुरू वसिष्ठ यांना तशी विनंती केली की, आपण शंभर यज्ञ करा आणि त्या पुण्याच्या जोरावर मला स्वर्गामध्ये स्थान मिळवून द्या. गुरू वसिष्ठ यांनी त्याला हे शक्य नाही हे समजावून सांगितले. पण तो हट्टाला पेटला होता. आपल्या देहवासना कायम ठेवून त्याला स्वर्गात जायचे होते. वसिष्ठांनी नकार दिल्यावर त्याने वसिष्ठपुत्रांना विनंती केली. पण त्यांनीही ही मागणी धुडकावून लावली. हा बालिश हट्ट सोड असे सांगितले. पण राजा ऐकायलाच तयार नाही हे पाहून त्यांनी त्याला चांडाळ होण्याचा शाप दिला. हट्टामुळे राजाची एवढी अधोगती झाली तरी तो हट्ट बाजूला ठेवायला तयार नव्हता.
अलीकडे आपणही अनेक वेळा फार मोठी स्वप्नं पाहणारी माणसे आजूबाजूला पाहतो. अनेकदा त्यांची अशक्य कोटीतली स्वप्ने साकारही होतात. पण तरीही ही उदाहरणे अपवादभूत असतात. आज-काल अशा अशक्यप्राय स्वप्नांचे मार्केटिंग केले जाते तेव्हा त्रिशंकूची ही गोष्ट पुन्हा आठवण्याची गरज आहे असे वाटते.
हे स्वप्न उराशी बाळगणाऱया त्रिशंकूची गाठ राजर्षी विश्वमित्रांशी पडली. तेव्हा शापामुळे त्याची अवस्था फारच बिकट झाली होती. विश्वामित्र स्वत मुळात राजकुलातील असल्यामुळे ही त्यांना त्याच्याविषयी अधिक सहानुभूती वाटली असावी. याप्रसंगी विश्वामित्रांकडे मदत मागताना त्रिशंकूने आपली बाजू छान मांडली आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर ‘स्मार्टली’ मांडली आहे. आपल्या आजवरच्या उत्तम वागणुकीचा दाखला देऊन तो विश्वामित्रांचे मन वळवू पाहतो की स्वर्गात जागा मिळणे ही माझ्या हक्काची गोष्ट आहे.
हे जरी खरे असले तरी वसिष्ठांचा विरोध हा देहवासना कायम ठेवून स्वर्गाला जाण्याला होता, हे तो आणि काही प्रमाणात विश्वामित्रही सोयीस्कररीत्या विसरताना दिसतात. विश्वामित्रांच्या बाजूने पाहायला गेले तर त्यांना या निमित्ताने जणू आपल्या तपश्चर्येचे बळ सिद्ध करायचे आहे. अशाप्रकारे दोघेही जिद्दीने पेटून उठले आहेत. विश्वामित्र त्याच्यासाठी यज्ञ करतात. यज्ञातील शेवटची आहुती दिली तरीही देवतांनी त्यांना इच्छित फळ दिले नाही. तेव्हा विश्वामित्र अतिशय संतापले आणि त्यांनी स्वतच्या तपश्चर्येचे फळ वापरून त्रिशंकू राजाला स्वर्गात धाडले. तो स्वर्गाकडे सदेह प्रवास तर करू लागला, पण इंद्राने त्याला मध्येच अडवले की, ‘तू अधोमुख पृथ्वीवर पडशील.’ त्याने ‘त्राही त्राही’ असे म्हणत मदतीसाठी विश्वामित्रांना हाक मारली. त्यांनी त्याला ‘तिष्ठ’ असे म्हणून मध्येच थांबवले. आता तो ‘ना स्वर्गात होता ना पृथ्वीवर.’ मग विश्वामित्रांनी त्याच्यासाठी दुसरा स्वर्गच बनवायचे ठरवले. दक्षिण दिशेला त्याच्यासाठी एक नवी नक्षत्रमाला तयार केली. विश्वामित्रांनी प्रतिइंद्र आणि प्रतिदेवताही निर्माण करण्यास घेतल्या. तेव्हा मात्र देवांनी त्यांना अडवले. त्यांचे तपोबल मान्य केले. जरी त्रिशंकूला स्वर्गात स्थान दिले नाही तरी त्याला अवकाशात ताऱयाचे तेजस्वी स्थान दिले. विश्वामित्रांनी तयार केलेली नक्षत्रमालाही कायम राहील असा वर दिला. आजही क्रक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारकासमूहाचे भारतीय नाव ‘त्रिशंकू’ आहे आणि हे दक्षिण गोलार्धातील नक्षत्र आहे. त्याच्या बाजूला सप्तर्षीसारखा वाटणारा एक तारकांचा पुंजकाही दिसतो, ती जणू विश्वामित्रांनी तयार केलेली नक्षत्रमाला आहे.
ह्या गोष्टीतले हे खगोलशास्त्रीय संदर्भ अचंबित करणारे आहेत. पुन्हा एकदा महत्त्वाकांक्षा, जिद्द या मुद्द्यांकडे वळायचे तर विश्वामित्रांच्या सामर्थ्यापुढे देवही झुकलेले दिसतात. याचे कारण कदाचित हे असावे की, ते दुसऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावायला तयार होते. त्यात स्वार्थ नव्हता. त्रिशंकू मात्र अतिमहत्त्वाकांक्षेमुळे मधल्यामध्ये लटकत राहिला. अर्थात ह्या गोष्टीचे आणखीही अर्थ लावता येतील. अनेक अर्थांची शक्यता ही गोष्टसुद्धा उत्तम कथेचा गुण असतेच, नाही का?
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाची अभ्यासक)