
प्रभादेवी येथील रचना संसद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या बौद्धिक कलाकुसरीच्या माध्यमातून साकारलेल्या कलात्मक रचना आणि सृजनशीलतेच्या आविष्काराची विविध रूपे पाहताच मन प्रफुल्लित झाले, अशी भावना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
प्रभादेवीच्या रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड अँड क्राफ्टमध्ये वार्षिक प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्या वेळी कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी कॉलेजच्या प्रभारी प्रिन्सिपल डॉ. आदिती झा आणि विशेष सन्मानित असे विद्यार्थी पंकज आनंददेखील उपस्थित होते. या प्रदर्शनात वेगवेगळ्या वर्षातील विद्यार्थ्यांची प्रोजेक्ट लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली मेहनत व त्यांना लाभलेला प्राध्यापकांचा परिसस्पर्श यामुळे हे वार्षिक प्रदर्शन खूपच रंगतदार झाले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्राध्यापक नीलिमा जाधव यांनी केले आहे.