नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण, डॉ. नीलेश शेळकेला शनिवारपर्यंत कोठडी

नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणामध्ये डॉ. नीलेश शेळके याला काल अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शेळकेला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी तपास सुरू केल्यानंतर फॉरेन्सिक अहवालामध्ये डॉ. नीलेश शेळके याचा कशा पद्धतीने सहभाग आलेला आहे, हे सिद्ध झाले आहे. शेळकेच्या बँक खात्यावर 10 कोटी रुपयांची रक्कम परस्पररीत्या कशा पद्धतीने आली, तसेच इतर काही बाबी तपासात आढळून आल्यानंतर सोमवारी (24 रोजी) डॉ. शेळके याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

डॉ. शेळकेला न्यायालयामध्ये हजर केले असता, सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. घडलेला गुन्हा मोठा आहे. 200 ते 400 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. याअगोदर पोलिसांनी काही संचालकांना, तसेच बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. डॉ. शेळके याच्या खात्यामध्ये 10 कोटी रुपये परस्पररीत्या जमा झाले आहेत. नेमके हे कुठून व कसे आले, याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. तसेच यामध्ये अजून कोण कोण सामील आहे, याची माहिती घ्यायची आहे. गुह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे, तसेच कागदपत्रांची पडताळणीही करणे बाकी आहे. आरोपी तपासात मदत करीत नाही, असा युक्तिवाद केला. आरोपी शेळके याच्या वतीने ‘माझा या गुह्याशी काही संबंध नाही. विनाकारण मला अटक केली आहे,’ यासह विविध मुद्दे युक्तिवादामध्ये त्याच्या वकिलामार्फत मांडण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शेळके याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

नगर अर्बन बँकेच्या गुह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी आता फॉरेन्सिक ऑडिटचा विषय हाती घेतला असून, यामध्ये अनेक आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अनेक आजी-माजी संचालक फरार झालेले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.