नगर अर्बन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील प्रतिष्ठत डॉ. नीलेश शेळके याला आज आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने पकडले. या प्रकरणाची चौकशी करून आज पोलीस शेळके याला न्यायालयात हजर करणार आहेत, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.
नगर अर्बन बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यासंदर्भात बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा व अच्युत पिंगळे यांनी आवाज उठविला आहे. त्यानुसार नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. नीलेश शेळके याच्यावर यापूर्वीही आर्थिक गुन्हे विभागाने कारवाई केली होती. शेळके यांनी बनावट कागदपत्रे आणि संगनमत करून बँकेची फसवणूक केली आहे. या सर्व बाबी फॉरेन्सिक अहवालामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. घोटाळ्यात शेळके याचा थेट समावेश असल्याने पोलिसांनी त्याला आज दुपारी अटक केली. अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी अशोक कटारिया, अनिल कोठारी, राजेंद्र लुणिया, प्रदीप पाटील, सीए शंकर अंदानी, अविनाश प्रभाकर वैकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक यांना अटक झाली आहे. तसेच शेवगाव येथील बनावट सोने तारणाचा विषय गाजलेला आहे. त्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल असून, त्याची चौकशी सुरू आहे.
सध्या नगर अर्बन बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून, प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे विभागाने या प्रकरणासंदर्भामध्ये नाशिक येथे फॉरेन्सिक ऑडिट केले होते. यामध्ये सीए मर्दा यांचा समावेश होता. तर, डॉ. नीलेश शेळके याच्या नावावरसुद्धा मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. दरम्यान, यासंदर्भामध्ये उपअधीक्षक अमोल भारती यांच्याशी संपर्क साधला असता, आज दुपारी शेळकेला अटक केली असून, पोलीस सर्व प्रकरणाचा तपास करीत असून, उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.