>> डॉ. मुकुंद कुळे
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही दोन आर्ष महाकाव्यं साहित्यकृती म्हणून निसंशय प्रशंसनीय आहेत. त्यातील कथाशय आणि व्यक्तिरेखा हिंदुस्थानी मनाला निरंतर भुरळ पाडत आल्या आहेत. हजारो वर्षांनंतरही या महाकाव्यांची मोहिनी उतरायला तयार नाही. या अर्थाने रामायण-महाभारत खरोखरच अजरामर आहे, पण म्हणून वाल्मीकी आणि व्यासांनी निर्मिलेल्या या महाकाव्यांना कुणी प्रश्नच विचारायचे नाहीत? या महाकाव्यातून ज्या काही आदर्शांचं आणि नीतिमूल्यांचं दर्शन घडलं असेल, तेच अंतिम मानायचं?
इतिहासाच्या अभ्यासात कोणताच शब्द किंवा निष्कर्ष अंतिम असत नाही. कारण नव्याने पुढे आलेला पुरावा इतिहासाच्या आधीच्या निष्कर्षाला मागे सारत असतो. तद्वतच पुराण काय किंवा महाकाव्य काय, त्याचे नवनवे अन्वयार्थ लावण्याचे प्रयत्न होणारच… आणि आपण कितीही ‘पुराणातली वानगी पुराणात’ असं म्हणालो तरी पुराणातली वानगी वर्तमानात आणि भविष्यातही लुडबुड करतच राहणार. कारण आपण हिंदुस्थानी एकूणच आपल्या कला-साहित्य-संस्कृती-परंपरेकडे तटस्थपणे पाहतच नाही. आपल्यासाठी आपला (हिंदुस्थानचा) भूतकाळ कायमच ‘भव्य-दिव्य’ असतो. परिणामी जरा कुणी विद्यमान काळाच्या संबंधात त्याची चिकित्सा करायला लागलं की, लगेच आपल्या भावना दुखावतात. खरं तर या भावना सर्वसामान्य माणसाला दुखावतात की नाही ते माहीत नाही. कारण अनेकदा त्यांना स्वतचं असं मत नसतं. समोरचा जे सांगेल तेच त्यांचं मत असतं आणि अनेकदा त्यांचं हे मत परंपरावादी ठरवत असतात. कारण समाजाने परंपराशरण असणं परंपरावाद्यांना नेहमीच आवडत असतं. पण तेच जर एखाद्याने बुद्धिभेद करायचा प्रयत्न केला की, परंपरावादी चिडतात. विशेषत आपल्या जुन्या धर्मग्रंथांच्या, रामायण-महाभारतादी काव्यांच्या संदर्भात एखाद्याने परंपरेने सांगितलेला अर्थ न स्वीकारता नवा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केला की, त्यांचा राग अनावर होतो. व्यास आणि वाल्मीकी म्हणजे तर परंपरावाद्यांचे कंठमणीच. त्यामुळे रामायण-महाभारत म्हणजे त्यांच्यासाठी जणू अंतिम सत्य!
परंतु ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही दोन आर्ष महाकाव्यं साहित्यकृती म्हणून निसंशय प्रशंसनीय आहेत. त्यातील कथाशय आणि व्यक्तिरेखा हिंदुस्थानी मनाला निरंतर भुरळ पाडत आल्या आहेत. हजारो वर्षांनंतरही या महाकाव्यांची मोहिनी उतरायला तयार नाही. या अर्थाने रामायण-महाभारत खरोखरच अजरामर आहे, पण म्हणून वाल्मीकी आणि व्यासांनी निर्मिलेल्या या महाकाव्यांना कुणी प्रश्नच विचारायचे नाहीत? या महाकाव्यातून ज्या काही आदर्शांचं आणि नीतिमूल्यांचं दर्शन घडलं असेल, तेच अंतिम मानायचं? तथाकथित परंपरावाद्यांचं तरी कायम तसंच म्हणणं असतं आणि म्हणूनच कुणी रामायण-महाभारत किंवा प्रथा-परंपरांबद्दल वेगळं काही सांगू पाहिलं की, लगेच ते अंगावर येतात. अलीकडेच नाही का ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून गेले होते! अर्थात ते काही पहिलंच उदाहरण नव्हतं. अगदी तीन-चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक कमल हसन यांचं महाभारतावरील केवळ एक विधान आणि मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘महाभारत’ हा चित्रपट, हे दोन्ही वादाच्या भोवऱयात सापडले होते.
वास्तविक अनेकार्थ क्षमता हे कोणत्याही साहित्यकृतीचं उत्तम लक्षण मानलं जातं. त्या न्यायाने रामायण आणि महाभारत कायमच उत्तम साहित्यकृती राहिलेल्या आहेत. कारण गेली हजारो वर्षं या काव्यांचा अनेक जण आपापल्या परीने अन्वयार्थ लावायचा प्रयत्न करत आहेत. अगदी आधुनिक काळातही असे काही कमी प्रयत्न झालेले नाहीत. प्रसिद्ध बंगाली नाटय़कर्मी सावली मित्रा यांचं ‘नाथवती अनाथवत’, ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांचं ‘अंधायुग’, लोकप्रिय कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांची ‘पर्व’ ही कादंबरी किंवा मराठीतील इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ आणि दुर्गा भागवत यांचं ‘व्यासपर्व’… या सगळ्या नाटय़-साहित्यकृतींनी महाभारतातील कथाशय आणि त्यातील पात्रांचा आपापल्यापरीने अन्वयार्थ लावण्याचाच प्रयत्न केलेला आहे. कारण रामायण-महाभारतात तशा ‘मोकळ्या’ जागा आहेत!
या पार्श्वभूमीवर कमल हसन यांनी त्यावेळी एका तामीळ वृत्तवाहिनीवर बोलताना केलेलं एक वक्तव्य मुळीच आक्षेपार्ह नव्हतं. ते फक्त एवढंच म्हणाले होते – “ज्या ग्रंथात एका महिलेला जुगाराला लावलं जातं आणि तिचं भरसभेत वस्त्रहरण केलं जातं, त्या ग्रंथाला आपल्या देशात मोठा मान दिला जातो याचं आश्चर्य वाटतं.’’ मात्र कमल हसन यांचं हे वक्तव्य हिंदूविरोधी असल्याचं सांगत ‘हिंदू मक्कल कच्ची’ या हिंदुत्ववादी संघटनेने तामीळनाडूमधील तिरुनेलवेली जिल्हा कोर्टात याचिका दाखल केली होती.
मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘महाभारत’ या सिनेमाबद्दलही तेव्हा तसंच घडलं होतं. केरळचे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक एम. टी. वासुदेवन नायर यांच्या ‘रंदमुझम’ या कादंबरीवर आधारित असलेल्या या सिनेमाची नुसती घोषणा होताच केरळमधील सनातन्यांनी या सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली होती. या कादंबरीसाठी वासुदेवन नायर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. कारण त्यांनी या कादंबरीत महाभारताचा वेगळा अन्वय लावण्याचा प्रयत्न केला होता.
‘रंदमुझम’चा अर्थ दुसरं वळण किंवा दुसरं पर्व. पांडवांच्या अखेरच्या महाप्रस्थानाच्या प्रसंगापासून सुरू होणाऱया या कादंबरीत नायर यांनी भीम या पात्राच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाभारताचा धांडोळा घेतला आहे. म्हणून दुसरं वळण. खरं तर मानवी राग-लोभ ज्याच्यात उत्तम उतरलेत अशी भीम ही महाभारतातील एकमेव व्यक्तिरेखा. परंतु धर्मनिष्ठ युधिष्ठिर आणि पराक्रमी अर्जुन यांच्या मध्ये जन्माला आल्यामुळे म्हणजेच दुसरा असल्यामुळे त्याची काहीशी उपेक्षाच झाली. त्याच्या नजरेने महाभारताकडे पाहताना नायर यांनी व्यासांनी जिथे जिथे मौन बाळगलंय अशा काही जागाही बोलक्या केल्या आहेत. उदाहरणार्थ, अर्जुनाने स्वयंवरात जिंकून आणल्यानंतर कुंती द्रौपदीशी कशी वागली ते मानवतेला धरून होतं का? याचंही विश्लेषण या कादंबरीत आहे.
मुळात भीमाच्या नजरेतून महाभारताकडे पाहावंसं वाटणं हेच खूप सूचक आहे. कारण भीमाकडे आडदांड-मठ्ठ म्हणूनच पाहण्याची आजवरची रीत आहे. परंतु महाभारतातल्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी तोच खऱयाखुऱया माणसासारखा वागलेला दिसतो. मग ते कौरवांच्या विरोधात पेटून उठणं असो की द्रौपदीचा अपमान केला म्हणून कीचकाचा वध करणं असो. म्हणून तर इरावती कर्वेदेखील आपल्या ‘युगान्त’मधील द्रौपदीवरच्या लेखात लिहितात की, महाप्रस्थानाच्या वेळी पहिल्यांदा द्रौपदी पडली तेव्हा भीमाला आश्चर्य वाटलं आणि नेहमीप्रमाणेच पुढे होऊन, “मी काय करू तुझ्यासाठी?’’ असे त्याने द्रौपदीला विचारलं तेव्हा द्रौपदी म्हणाली, “पुढल्या जन्मी पाचातला थोरला भाऊ हो भीमा, तुझ्या आसऱयाखाली आम्ही सारे निर्भयपणे आनंदात राहू…’’ द्रौपदीचं हे एक वाक्यच सारं काही सांगून जातं. या एका वाक्यात इरावतीबाईंनी भीमाची झालेली उपेक्षा व्यक्त केली आहे आणि तीच उपेक्षा-खंत वासुदेवन नायर यांनी त्यांच्या ‘रंदमुझम’ या कादंबरीत नेमकी टिपली आहे. परंतु यामुळेच महाभारताला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, भावना दुखावल्या जात असल्याचं कारण सांगत परंपरावादी तेव्हा रस्त्यावर उतरले होते.
खरं तर कमल हसनचं ते वाक्य काय किंवा वासुदेवन नायर यांची कादंबरी काय किंवा इतरही कोणत्याही कलावंताचा रामायण-महाभारतावरचा नवीन आविष्कार काय, तो त्यांचा विचार म्हणजेच एक प्रकारची अभिव्यक्तीच असते. मात्र ती अभिव्यक्ती जर परंपरेला छेद देत असेल, तो एक वेगळा प्रयोग असेल तर परंपरावादी लगेच विरोधाचं अस्त्र बाहेर काढतात. एकूण आमच्या परंपरेला कुणी प्रश्न विचारायचा नाही, असा त्यांचा आविर्भाव असतो. मात्र हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास-संस्कृती यांचा अभ्यास करून त्याचा नव्याने, नव्या दृष्टिकोनातून ताळेबंद घेणं, हे अभ्यासक-संशोधक-लेखक मंडळी यांचं कामच आहे. अभ्यासक-संशोधक, इतिहासाची-संस्कृतीची वस्तुनिष्ठ मांडणी करत असतात. तर लेखक आपल्या प्रतिभेने एक प्रकारे कालपटलावरील मौनाची भाषांतरं करत असतो, परंतु हेच संस्कृती रक्षकांना मान्य नसतं. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून आमची परंपरा, आमची संस्कृती पवित्र आणि आदर्शच आहे. तिची चिकित्सा करायची नाही!
पण परंपरा अनेक गोष्टी दडवतही असते. किंबहुना आजवर याच परंपरेच्या नावाखाली स्त्रियांना-दलितांना पशूपेक्षाही वाईट वागणूक दिली गेली. कित्येकांचे नाहक बळीही गेले. परंतु परंपरावाद्यांनी परंपरेचं प्रस्थच एवढं जबरदस्त निर्माण केलं होतं की, या अन्यायाच्या विरोधात कुणी साधा ‘ब्र’ही उच्चारला नाही. पण सदासर्वकाळ परिस्थिती आहे तशीच राहत नाही. काळाला पालाण घालणारे चक्रधर, ज्ञानेश्वर, जनाबाई-मीराबाई-लल्लेश्वरी-अक्कमहादेवी, कबीर, बसवेश्वर, तुकाराम, फुले-शाहू-आंबेडकर जन्माला येतातच आणि काळासमोर, धर्मग्रंथ-महाकाव्यांसमोर प्रश्न उभे करतातच. त्यांनी उभे केलेले हे प्रश्न किंवा परंपरावाद्यांना विचारलेला जाब म्हणजे त्यांची अभिव्यक्तीच तर असते. कमल हसनने विचारलेला सवाल आणि वासुदेवन नायर यांच्या ‘रंदमुझम’वर आधारित ‘महाभारत’ सिनेमा अभिव्यक्तीशिवाय दुसरं काय होतं? उद्या तुम्ही मनुस्मृती किंवा रामायण-महाभारताचा वेगळा अन्वयार्थ लावायचा प्रयत्न केलात की, बघा तुमच्यापाठी परंपरावादी लागतात की नाही! पण म्हणून थोडंच कुणी आता आपली अभिव्यक्ती, आपले विचार मांडायचं थांबणार आहे! तो जमाना गेला.