
डॉ. मीना प्रभू यांचा जन्म 27 ऑगस्ट 1939 रोजी पुण्यात झाला. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. विवाहानंतर त्या इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी अनेक वर्षे भूलतज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून रुग्ण सेवा केली. वैद्यकीय क्षेत्रातील काम सुरू असताना, त्यांनी मराठीत प्रवासवर्णनपर लेखनास सुरुवात केली. पुढे त्यांनी कादंबरी लेखन केले. त्यांचे कवितासंग्रहही प्रकाशित झाले.
विविध देशांमधील संस्पृती, समाजव्यवस्था, राहणीमान, तेथील नागरिकांची स्वभाववैशिष्टय़े आणि त्या देशांचे ऐतिहासिक पंगोरे सहजसोप्या आणि ओघवत्या शैलीत मांडण्याची त्यांची हातोटी होती. रंजक वर्णने आणि एका सर्वसामान्य स्त्रीच्या भूमिकेतून अनुभवलेले विविध प्रसंग त्यांनी मांडल्याने या लेखनातून वाचकांना जणू प्रत्यक्ष तो देश फिरून आल्याची प्रचीती मिळाली.
‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. दृष्टिहीन बांधवांसाठी हे पुस्तक ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित करण्यात आले. तत्कालीन संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना ‘पुकरी’ हे मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. पहिल्याच पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर प्रभू यांच्या लेखनाला प्रोत्साहन मिळाले. पुढे ‘इजिप्तायन’, ‘तुर्पनामा’, ‘ग्रीकांजली’, ‘चिनी माती’, ‘गाथा इराणी’ ही त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली. ‘रोमराज्य’ (भाग 1 आणि 2), ‘वाट तिबेटची’, ‘न्यूयॉर्प-न्यूयॉर्प’, ‘उत्तरोत्तर’, ‘अपूर्व रंग’ (1 ते 4 भाग) ही पुस्तके त्यांनी लिहिली.
मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भुषविले होते. प्रदीर्घ साहित्यसेवेची दखल घेऊन प्रभू यांना दि.बा. मोकाशी पारितोषिक, गो.नि. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, न.चिं. केळकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. गेल्याच वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.