कला परंपरा- बांबूच्या कलाकृती

>> डॉ. मनोहर देसाई

बांबूचा वापर जसजसा वाढत गेला तसा बांधावरचा बांबू शेतकरी त्याच्या शेतात पिकवू लागला आणि बांबूची शेती हा एक मोठा व्यवसाय उदयास आला. यातूनच पुढे बांबूपासून तयार होणाऱया कलाकृती वापरल्या जाऊ लागल्या. परंतु त्याही आधीपासून बांबूशी निगडित कला परंपरा आणि संस्कृतीचा अंतर्भाव असल्याचे उल्लेख अगदी प्राचीन काळापासून दिसून येतात.

निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. पूर्वी शेताच्या बांधावर बांबूची लागवड शेतकरी करत असत. याच बांबूंचा वापर शेतकरी त्याच्या घरगुती कामासाठी करत असे. घरावरील छत बांधताना आधार म्हणून, कुंपणासाठी, चटया, रोवळ्या, सूप, शिडय़ा या आणि अशा अनेक कारणांसाठी बांबूचा वापर होत असे. कोकणात व देशातील आणि परदेशातील काही प्रांतात बांबूचा वापर काही पदार्थ तयार करण्यासाठीसुद्धा होतो.

बांबूचा वापर जस जसा वाढत गेला तसा हाच बांधावरचा बांबू शेतकरी त्याच्या शेतात पिकवू लागला. बांबूची शेती हा एक मोठा व्यवसाय उदयास आला. अनेक कंपन्या या व्यवसायात उतरल्या आणि बांबूला मागणी वाढली. पुण्याजवळ बांबू टेल्स नावाच्या 25 एकराच्या क्षेत्रामध्ये बांबू उत्पादन आणि त्यापासून विविध वस्तू तयार करण्याच्या प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला. बांबूचा उपयोग करून विविध कलाकृती व इतर कामांसाठीसुद्धा बांबूचा वापर वाढला आणि याकरिता काम करणाऱया समूहाचे प्रतिनिधी अशोक सातपुते व इंजिनीयरिंग शिक्षण झाल्यानंतर बांबू शेतीकडे वळत व त्यापासून विविध वस्तू तयार करण्याच्या प्रकल्पात झोकून देणाऱया मृणाल काळे या युवतीने या विषयासंबंधित बरीचशी माहिती सांगितली.

बांबू हे एक प्रकारचे गवत. नव्या पिढीत त्याला बांबूची झाडे असेसुद्धा संबोधतात. बांबूच्या अनेक प्रजाती आज देशात आणि प्रदेशात उपलब्ध आहेत. बांबूचा मजबूतपणा आणि त्याची लांबी या गुणामुळे सुरुवातीला बांबू छतासाठी वापरला गेला. आधुनिकतेच्या युगात आज घराच्या छतांसाठी किंवा मांडववाल्यांकडे विविध धातूंचे पर्याय वापरून बांबू या कारणासाठी वापरण्याचे प्रमाण कमी झाले. परंतु पुन्हा एकदा बांबूला या क्षेत्रात मागणी वाढली. बांबूचा वापर करत अनेक आर्किटेक्ट आणि फर्निचरमध्ये काम करणाऱया मंडळींनी सुंदर फर्निचर व उद्यानामध्ये कॅनोपीसारखे प्रकार तयार केले.

बांबूपासून वस्तू तयार करताना त्याच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. बांबूचे आयुष्य वाढावे म्हणून त्याच्यावर केमिकलचा वापर करून प्रक्रिया केली जाते. बांबू वळवायचा असेल तर त्याला हिटिंगची ट्रिटमेंट वापरून तो वळवला जातो. बांबूच्या वस्तूंवर पॉलीश केले जाते. आपल्याकडे दिवाळीच्या सणाला पूर्वी आकाश कंदील हा बांबूच्या काठय़ांपासून तयार केलेल्या सांगाडय़ावर रंगीत कागद चिकटवून केला जात असे.

कोकणातील मंडळी त्यांच्या लग्नासाठी असणाऱया विधींमध्ये सूप आणि रव्याचा वापर करतात. या वस्तू अजूनही बाजारात मिळतात, बांबूपासून पेन स्टँड, कार्ड होल्डर, टेबल लॅम्प अशाही वस्तू तयार होत आहेत. या वस्तूंवर नावे कोरण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मशीनचा वापर करत बांबूपासून अनेक छोटय़ा छोटय़ा खेळण्यांच्या निर्मितीलासुद्धा आता मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे. छोटय़ा छोटय़ा खेळण्यांमधल्या गाडय़ा, प्राणी, पक्षी तयार करण्यात आ}s. विविध राज्यांमधून या उद्योगावर अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम व इतरही काही ठिकाणी बांबूची शेती करून त्यातून एक वेगळा उद्योग उभा करून काही तरुण या उद्योगात नवी भर टाकत आहेत.

बांबूच्या प्रकारांना वेगवेगळ्या प्रांतात त्यांच्या वेगवेगळ्या नावांनी ओळख देण्यात आली आहे. बांबूच्या प्रजाती दोन गटांमध्ये विभागल्या जातात. सिम्पोडियल (क्लम्पिंग) आणि मोनोपोडियल (धावणारी) प्रजाती.

आपल्या देशामध्ये पूर्वी ग्रंथसंपदा लिहिण्यासाठी कागदाचा वापर केला जात असे. कागद जसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला तसतसा ग्रंथ निर्मितीला वेग आला. या ग्रंथांवर लेखनासाठी बोरूचा वापर केला जात असे. हे बोरूसुद्धा बांबूपासूनच तयार होत. सोळाव्या शतकापासून पुढे उपलब्ध असणाऱया अनेक हस्तलिखित ग्रंथांमध्ये लेखणासाठी वापर करण्यात आलेल्या लेखण्या या सुबक अक्षरांमुळे अभ्यासाचा विषय आहेत. सुलेखन करणाऱया अनेक सुलेखनकारांच्या कार्यशाळांमधून मिळवलेल्या लेखण्या अतिशय उत्तम स्वरूपात आजही संग्रहालयांमधून उपलब्ध आहेत. शिवाय पूजेसाठी शाईचा दौत आणि लेखणी ठेवण्याची औपचारिकता हा लेखन संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग आहे.

काही घरांमध्ये आजही गुरूने बोरूनेच अक्षरांचा सराव केल्याची आठवण घरातील वडीलधारी मंडळी सांगतात. या बांबूच्या बोरूने लिखाणाचा उत्तम सराव होतो. वळणदार व सुंदर अक्षर काढण्यासाठी एकेकाळी शाळाशाळांमधून धडपड होत असे. रेखीव अक्षरे काढण्यासाठी बांबूच्या बोरूंचा वापर पुन्हा एकदा सुरू व्हावा यासाठी अनेक सुलेखनकार प्रयत्न करत आहेत. बांबूचा वापर ज्या ज्या क्षेत्रात होत आहे त्या सर्व क्षेत्रांसाठी नवनवीन आव्हानेसुद्धा आहेत. आपण दोन पावले पुढे येऊन बांबूपासून निर्मिती झालेल्या या कलाकृतींकडे आदराने पहात त्यांचा वापर सुरू केला पाहिजे. अॅनिमेशन व उपयोजित कला या क्षेत्रात काम करणाऱया तरुण अशोक सातपुते याच्याशी चर्चा करताना तो नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून विविध खेळणी तयार करून घेत अनेक ग्रामीण भागातील कलाकारांना पुण्यामध्ये प्रोत्साहन देत आहे. बांबूपासून वस्तू निर्मिती करताना वेगवेगळे प्रयोग करत नवनव्या कलाकृतीसुद्धा घडत आहेत. आपल्या कलाकारांनी तयार केलेल्या या देसी बाज असणाऱया कलाकृतींसाठी प्रत्येकाने आग्रह धरला पाहिजे. बांबू हे झाड नसून ते एक प्रकारचे गवत आहे. गवताची ही पाती उंच उंच वाढतात. बांबूच्या वस्तूंनासुद्धा आता जगभर मागणी वाढली आहे. या क्षेत्रात काम करणाऱया कलाकारांना भरारी घेता यावी अन् बांबूला पुन्हा सुगीचे दिवस यावेत हीच अपेक्षा.

[email protected]