कला परंपरा – महाराष्ट्राचे वैभव

>> डॉ. मनोहर देसाई

महाराष्ट्राच्या विविध कला आणि हस्तव्यवसाय यामध्ये घोंगडी विणणे हा कलाप्रकार खूपच वेगळा. पारंपरिक वारसा लाभलेली ही कला आजही जिवंत आहे. महाराष्ट्राच्या एकूण इतिहासात घोंगडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महाराष्ट्राच्या विविध कला आणि हस्तव्यवसाय यामध्ये घोंगडी विणणे हा कलाप्रकार खूपच वेगळा. पारंपरिक वारसा लाभलेली ही कला आजही जिवंत आहे आणि नवविचारांच्या पिढीमध्ये या कलेतून निर्माण झालेल्या वस्तू वापरण्याची आवड दिसत आहे. घोंगडी तयार करण्यासाठी जी लोकर लागते ती मेंढय़ांपासून मिळते. मेंढय़ा पाळणे हा तसा महाराष्ट्रातील धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय. मेंढय़ांचे मोठे कळप घेऊन धनगर मोकळ्या माळरानावर हे कळप सोडून देतात. एका गावातून दुसऱया गावाकडे जाताना आपल्या जनावरांना मुबलक चारा मिळेल ही त्यांची भाबडी आशा. लांब काठीला पुढे कोयता किंवा खुरपे लावलेले अशी बांबूची काठी, मिरवत धनगर मेंढय़ांच्या कळपाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत रस्त्यातून वाट काढताना दिसतो.

महाराष्ट्राच्या डोंगररांगांमध्ये राहणाऱया शिवछत्रपतींच्या बहुसंख्य मावळ्यांच्या खांद्यावर घोंगडी असे. किंबहुना महाराष्ट्राच्या एकूण इतिहासात घोंगडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरील चित्रपटात तर डोंगर-दऱयातून हळूहळू उतरणारे मावळे त्यांच्या खांद्यावर घोंगडी असे. महाराष्ट्रातल्या बहुतांश घरांमध्ये विविध धार्मिक विधींसाठी लग्नकार्यांमध्ये बैठकांसाठी घोंगडीचा वापर आजही पारंपरिक कारणासाठी व विधींसाठी आवश्यक वस्तू म्हणून चालू आहे.

प्रामुख्याने घोंगडय़ांचे दोन प्रकार. एक पारंपरिक पद्धतीने बनवलेली घोंगडी आणि दुसरी मशीनच्या सहाय्याने. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या घोंगडीचे काही उपप्रकार आहेत, परंतु या घोंगडीची किंमतही थोडीशी जास्त असते. तर मशीनवर तयार केलेल्या घोंगडय़ा या तुलनेने स्वस्तात मिळतात. मशीनवर तयार केलेल्या घोंगडय़ांमध्ये बरेचदा लोकरीसोबत इतर साहित्य मिसळले जाते. पारंपरिक पद्धतीच्या घोंगडय़ा या पूर्णपणे कारागीर अतिशय मेहनतीने तयार करतात. कोवळ्या वयातल्या मेंढय़ा त्यांच्या लोकरीपासून तयार केलेल्या घोंगडय़ांना ‘जावळाच्या घोंगडय़ा’ असे संबोधतात. वयात आलेल्या मोठय़ा मेंढय़ांच्या लोकरीपासून तयार केलेल्या घोंगडय़ा या बरेचदा अंगावर घेतल्यानंतर टोचल्यासारखे वाटते. परंतु धनगर सांगतो, ही टोचणारी घोंगडीच चांगली.

मेंढय़ांना उत्तम प्रकारचा चारा व पाणी मेंढपाळ उपलब्ध करून देतात. त्यांच्या आवर अंगावर लोकर बहरते. दाट लोकर तयार झाली की त्या मेंढय़ाना वेगळे काढून त्यांची लोकर काढली जाते. नंतर स्वच्छ धुतली जाते व त्यावर प्रक्रिया करून सूत काढण्यासाठी ती चरख्यावर लावली जाते. चरख्यावर पारंपरिक पद्धतीने काम करणारे कारागीर व बरेचदा महिला या त्यातून सूत तयार करतात. कापसापासून तयार होणारे सूत हे अतिशय पातळसुद्धा तयार होते तसे लोकर ही मुळातच थोडीशी जाड गुणधर्म असणारी असल्यामुळे याचे सूत थोडे जाडसरच तयार होते. तयार झालेले सूत विणकामासाठी कारागीर पुढे घेऊन जातात. हल्ली घोंगडय़ांमध्ये पांढरी व काळी या व्यतिरिक्तसुद्धा इतर रंग उपलब्ध होऊ लागले आहेत. पारंपरिक घोंगडी ही काळ्या रंगाची. घोंगडीचे माप घेताना कारागीर अगदी झटपट सांगतो ही नऊ हाताची. हल्ली देवघरामध्ये बसण्यासाठी वापरण्यात येणाऱया छोटय़ा आकाराच्या बैठकासुद्धा याच प्रकारात तयार करून घेतल्या जातात असे दिसते. घोंगडीच्या कापडाच्या इतरही अनेक वस्तू हल्ली बाजारात उपलब्ध आहेत.

पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या घोंगडय़ांना आपल्या देशात आणि परदेशात अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये मागणी आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या घोंगडय़ा या बरेचदा काही वैद्यकीय उपचार किंवा त्याच्या वापरातून मिळणारे लाभ याकरिता सुद्धा आग्रहाने वापरल्या जातात. या घोंगडय़ांवर शांत झोप लागते. पाठीच्या मणक्याचे, मानेचे आजार, त्वचेचे विकार असतील तर या घोंगडय़ा जमिनीवर अंथरून, त्यावर झोपल्यास बरेचदा हे आजार बरे होतात असे सांगितले जाते. वातावरणात जेव्हा उष्णता असते तेव्हा या घोंगडय़ांवर गारवा जाणवतो तर त्याच्या अगदी बरोबर उलटे पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये या घोंगडय़ांमध्ये ऊब निर्माण होते. अशा प्रकारे सर्व ऋतूंमध्ये घोंगडय़ा वापरता येतात. शेतकरी पावसाळ्यामध्ये डोक्यावर याच घोंगडीच्या कोपऱया तयार करून त्या डोक्यावर धरून पावसात काम करत असत. पावसाचे पाणी घोंगडीवर पडल्यानंतर ती तुलनेने कमी भिजते व त्यावरून पाणी सहज निथळून जाते.

उत्तम दर्जाची पारंपरिक घोंगडी ही दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक किमतींना उपलब्ध आहे. तर मशीनवर तयार केलेल्या घोंगडय़ा या अगदी पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना नवीन पिढी ही आपल्या पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱया अनेक हस्तव्यवसाय व कलाकृतींपासून दूर जाताना दिसते. तासन्तास संगणकावर काम करताना किंवा मोबाइल हाताळताना शरीरात निर्माण होणाऱया व्याधींपासून सुटका करून घेण्यासाठी आयटी क्षेत्रातील बरेच लोक घोंगडीची चौकशी करतात.घोंगडीचा व्यवसाय करणारे महाराष्ट्राच्या विविध भागातील कारागीर यांनीसुद्धा आता काळाच्या बदलत्या स्वरूपात आपल्या व्यवसायाचे जाहिरातीकरण करून आपल्या वस्तूंची माहिती ही सोशल मीडियावर उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. व्यवसाय हा जरी त्यातला एक भाग असला तरीसुद्धा आपल्या पारंपरिक वस्तूतून मिळणारी ऊब, ही आपल्या माणसाला सुखावते, यात हा व्यवसायिक अधिक आनंदी असतो.

वाहतुकीच्या वेळी रस्त्यावर अडथळा ठरणारे हे मेंढय़ांचे कळप पाहून थोडासा विलंब झाला तर उगाच कुरकुर करतो. खरं तर गाडीतून उतरा, काही सेल्फी वगैरे काढायचे असतील तर या आमच्या मेंढय़ांबरोबर काढा. धनगरासोबत आपला फोटो काढा. सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करा. जगभर कळू देत आपली पारंपरिक संस्कृती आणि आपली हक्काची ‘ऊबदार घोंगडी.’

[email protected]
(लेखक कलाअभ्यासक आहेत.)