डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 असे दहा वर्षे पंतप्रधान पद भूषवले. या काळात विरोधक नेहमीच डॉ. मनमोहन सिंग फारसे बोलत नाहीत अशी टीका करत. परंतु विरोधकांच्या जहरी टीकेमुळे विचलित न होता डॉ. मनमोहन सिंग काम करत राहिले. विशेष म्हणजे ते पत्रकारांशी बोलणारे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारे पंतप्रधान होते. दहा वर्षांत डॉ. मनमोहन सिंग यांनी देश-विदेशात तब्बल 117 पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या तिसरी टर्म सुरू आहे. आजवर त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी यापूर्वीच याबाबत माहिती दिली होती. पंतप्रधान असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी 117 पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. 10 वर्षांत 72 विदेश दौरे, 23 वेळा राज्यांचे दौरे केले. त्या वेळी त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. 12 वेळा निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. तेव्हाही ते पत्रकारांशी बोलले.
मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म सुरू आहे. 10 वर्षांचा कालावधी होऊन गेला.पण आजपर्यंत तरी मोदींनी जाहीर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांसमोर येऊन केवळ दोन मिनिटेच निवेदन ते करतात. यावरून विरोधी पक्षांकडून मोदींवर टीका झाली.
शेवटच्या पत्रकार परिषदेत 62 हून अधिक प्रश्नांची उत्तरे दिली
पंतप्रधान म्हणून 3 जानेवारी 2014ला शेवटची पत्रकार परिषद झाली होती. 100हून अधिक पत्रकार उपस्थितीत होते. या वेळी डॉ. मनमोहन सिंगांनी 62हून अधिक प्रश्नांना उत्तरे दिली. एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, ‘‘मी कमकुवत पंतप्रधान आहे असे बिलकुल मानत नाही. समकालीन माध्यमे आणि विरोधी पक्षांपेक्षा इतिहास माझ्याबद्दल अधिक दयाळू असेल. मी माध्यमांना घाबरणारा पंतप्रधान नाही, असे ते म्हणाले.