कलासंस्कृती – वर्तुलम; एक अभिनव नृत्याविष्कार

>>मेघना साने

सुबल सरकार यांची कन्या नृत्यगुरू डॉ. किशू पाल यांनी या नृत्यशैलीची जपणूक करण्यासाठी ‘वर्तुलम’ हा कार्यक्रम आपल्या ‘नृत्यालिका’ संस्थेतील भरतनाट्यमच्या शिष्यांना घेऊन निर्मित व दिग्दर्शित केला आहे.

हिंदुस्थानी नृत्यनाट्याचे जनक कै. उदय शंकर यांनी लोकनृत्य, शास्त्राrय आणि उपशास्त्रीय नृत्य यांचा संगम करून आपल्या देशात एक नवा नृत्याविष्कार आणला होता. तो म्हणजे मुक्त नृत्यशैली. या नृत्यशैलीशी संबंधित असा त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘कल्पना’ नावाचा कृष्णधवल चित्रपट 1948 साली प्रदर्शित झाला. उदय शंकर यांच्यानंतर ही शैली त्यांचे शिष्य कै. सचिन शंकर आणि त्यांच्या नंतर त्यांचे शिष्य सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक कै. सुबल सरकार यांनी जपली. आता सुबल सरकार यांची कन्या नृत्यगुरू डॉ. किशू पाल यांनी या नृत्यशैलीची जपणूक करण्यासाठी ‘वर्तुलम’ हा कार्यक्रम आपल्या ‘नृत्यालिका’ संस्थेतील भरतनाटय़मच्या शिष्यांना घेऊन निर्मित व दिग्दर्शित केला आहे. डॉ. किशू पाल या स्वत कुचिपुडी, भरतनाटय़म व लोकनृत्य पारंगत आहेत. त्यांना नुकतेच सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचे झी वाहिनीचे अवॉर्डही प्राप्त झाले आहे. त्या केवळ कोरिओग्राफरच नाहीत, तर नृत्याच्या एक विचारी अभ्यासकही आहेत. त्यांनी लिहिलेली नृत्य या विषयावरील ‘संदर्भ भरतनाटय़म – द जर्नी ऑफ भाव, राग अँड ताल’ आणि ‘भारतीय लोकनृत्यों का सांस्कृतिक अनुशीलन’ ही पुस्तके नृत्याच्या अभ्यासकांना मोलाची ठरतील अशी आहेत.

माणसाचा जन्म ते मृत्यू हे एक वर्तुळ असतं. या कालचक्रात तो नाना अवस्थांमधून जातो. बाल्य, किशोरावस्था, तारुण्य, मध्यमवयीन गृहस्थ आणि नंतर वार्धक्य. या अवस्थांमधून जात असताना त्याने भोगलेले सुखाचे आणि दुःखाचे क्षण आपल्यासमोर नृत्यातून चित्रित होत असतात आणि शब्दांचा वापर न करता केवळ पार्श्वसंगीतावर कलाकारांच्या नृत्यविभ्रमांतून कथा साकार होत असताना आपण मनात ऐकत असतो आपल्याच आयुष्याची कथा! ही तर ज्याची त्याची कथा. म्हणूनच ते साहित्यही आहे. शब्दांशिवायचे साहित्य. आपण या सर्व अवस्थांमधून अखेर कुठे येऊन पोहोचतो? तर आपण कशासाठी जगत आहोत या विचारापाशी. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन ज्यांचे आहे त्या नृत्यगुरू डा. किशू पाल यांना एखाद्या समाधी अवस्थेत जीवनाचे आकलन झाले असावे. आपल्यातून बाहेर पडून त्यांनी जीवनाकडे पाहिले असावे. शेवटी मृत्यू अटळ आहे येथेच ही कथा थांबते का? नाही. तर माणूस संपतो तिथेच त्याचा पुनर्जन्म होतो. अशाच तऱ्हेने माणसाच्या पिढ्यानपिढ्या पुढे जात आहेत हेही नृत्यातूनच दर्शविले आहे.

कमीत कमी सेट, एकाच प्रकारची वेशभूषा, बालांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयांचे कलाकार, सतत बदलते संगीत घेऊन ‘नृत्यालिका’चे पंचवीस तरुण कलाकार जोशात सादर करतात माणसाच्या जीवनाची ही कथा. सादर करणाऱ्या कलाकारांना ही कथा पूर्ण पटलेली आहे, आपल्या भूमिका आणि कथेतून सांगितले जाणारे तत्त्वज्ञान नीट समजले आहे हे त्यांच्या हालचालींतील आत्मविश्वासावरून प्रेक्षकांच्या लक्षात येते. आज तरुणाई काही वेगळे सादर करीत आहे याचा आनंद रसिक प्रेक्षकांना होत होता. अर्थात हे यश आहे दिग्दर्शिका किशू पाल यांचे. तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या असलेल्या या कार्यक्रमाचे तांत्रिक व्यवस्थापन आणि विशेष प्रकाश योजना व्यवस्थापन कार्तिक पाल यांनी उत्कृष्टपणे हाताळले होते.

भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याच्या किंवा बॅलेच्या नियमांच्या चौकटीत हे नृत्यबद्ध केलेले नाही. यासाठी आवश्यक मुभा घेऊन काही प्रसंगही दाखवले आहेत. जसे तरुण, तरुणी एकत्र येतात. कधी त्यांचे जमते, कधी पटत नाही. कधी प्रेमात पडतात, विवाहबद्धही होतात. विवाहानंतरही या स्त्री-पुरुषांमध्ये खूप नाट्य घडत असते. कधी भांडतात, रडतात, एकमेकांची आर्जवे करतात. या सगळ्यालाच तर जीवन म्हणतात. नृत्यगुरू किशू पाल यांनी हे सर्व दाखवताना अत्यंत आधुनिक प्रकारची ट्रीटमेंट दिलेली आहे. वैशिष्टय़पूर्ण प्रकाशयोजनेमुळे प्रेक्षकही संमोहित होऊन सलग दीड तासाच्या या नृत्यनाट्यातून काही मूल्यांची पखरण केलेली दिसते. माणसाची अवस्था वार्धक्यात तेवढी आनंदाची नसते. त्याच्यामागे नाना व्याधी लागतात. घरच्यांना त्या माणसाचे रोज औषधपाणी करणे जड जाते, परंतु वृद्धांचीही आपल्या नातवंडांसाठी कशी गरज असते, त्यांच्या प्रेमामुळे नातवंडांचे जीवन कसे फुलते हेही दाखवले आहे. या सगळ्यातून लेखिकेला, दिग्दर्शिकेला, आहे ते जीवन आनंदाने जगूया, प्रेमाने जगूया व एकत्र कुटुंब राहूया असे सांगायचे आहे. या काळाला साजेसा असाच संदेश या कार्यक्रमातून दिला जातो.

ऑगस्टमध्ये ‘वर्तुलम’ या नृत्यनाट्याचा देखणा प्रयोग सादर झाला. याचे लेखन सुचरिता, तर संगीत संदेश हाटे यांचे होते. पं. श्री. अजय पोहनकर आणि पं. श्री. वेणुगोपाल पिल्ले यांच्या मधुर आलापीने संगीताला एक वेगळा आयाम प्राप्त झाला. चित्रपट दिग्दर्शक पद्मभूषण राजदत्त, पद्मश्री क्रांती शहा यांच्यासह कला क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या अभिनव कार्यक्रमाला उपस्थित होती.
[email protected]