दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमीलगत असलेल्या इंदू मिलच्या जागेवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. सहा वर्षांपासून स्मारकाचे कामकाज सुरू आहे. अजून किती दिवस लागणार? कधीपर्यंत हे स्मारक जनतेसाठी खुले होणार, असा सवाल अनुयायी व जनतेमधून विचारला जात आहे.
वर्ष 2018 पासून या स्मारकाच्या उभारणीला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 62 टक्के काम पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. अजून बरेच काम होणे बाकी असून ते वर्ष 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट असल्याचेही ते म्हणतात. पण स्मारक उभारणीला इतका कालावधी का लागतोय? आता सहा वर्षे लोटली तरी काम अर्धेअधिकच झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बघण्यास आम्ही आतूर आहोत. या ना त्या कारणाने स्मारकाचे काम न लांबवता ते गतीने व उत्कृष्ट दर्जाचे तयार करावे, अशी भावना अनुयायी व्यक्त करत आहेत.
राष्ट्रध्वज, उद्देशिका आणि राजमुद्रा
या स्मारकासाठी ज्यांनी प्रचंड पाठपुरावा केला आणि अजूनही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे असे ज्येष्ठ अनुयायी चंद्रकांत भंडारे यांनीदेखील संथगतीने सुरू असलेल्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. शिवाय या भव्य स्मारकात 465 फुटांचा भव्य राष्ट्रध्वज उभारावा, संविधानाची उद्देशिका भव्य स्वरूपात असावी तसेच भव्य राजमुद्रादेखील असावी, अशी मागणी भंडारे यांनी केली असून तसा पत्रव्यवहार त्यांनी शासनाकडे केला आहे.