
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या पूर्णत्वासाठी आणखी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरू असून जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. एमएमआरडीए आयुक्तांनी नुकतीच या स्मारकाच्या कामाची पाहणी करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे पुढच्या वर्षी बाबासाहेबांच्या अनुयायांना इंदू मिल येथील स्मारकात अभिवादन करता येणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे येतात, मात्र इंदू मिल येथील स्मारकाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने अनुयायी चैत्यभूमी येथूनच परततात. राज्य सरकारच्या एमएमआरडीएमार्फत इंदू मिलच्या 12 एकर जागेवर भव्य स्मारक बांधण्यात येत असून या प्रकल्पाच्या कामाला 2018 साली सुरुवात करण्यात आली. 36 महिन्यांत म्हणजेच 2021 मध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र 2025 साल उजाडले तरीदेखील स्मारक बांधून पूर्ण झालेले नाही. आता मात्र स्मारकाचे काम जलदगतीने सुरू असून मे 2026 मध्ये स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने ठेवले आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विकम कुमार यांनी नुकतीच इंदू मिल येथील स्मारकाला भेट देऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.
कामाची प्रगती टक्के
- डबल बेसमेंट पार्किंग 95
- प्रवेश प्रांगण 88.5
- व्याख्यानगृह 78.75
- ग्रंथालय 81
- प्रदर्शन व प्रेक्षागृह 68
- पदपथ इमारत 52.8