डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. डॉ. बलभीम मारुतीराव उर्फ ब. मा. पाटोदेकर यांचे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. करड्या शिस्तीचे, निर्भीड अधिकारी, असा विद्यापीठ प्रशासनात त्यांचा लौकिक होता. गुरूवारी सकाळी 9 वाजता रचनाकार कॉलनीतील निवासस्थानाहून डॉ. पाटोदेकर यांची अंत्ययात्रा निघणार असून बनेवाडी शिवारातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
युनायटेड स्टेट्स माहिती सेवेतून त्यांनी मुंबईत अमेरिकी दूतावासात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सांख्यिकी विभागातही त्यांनी काही काळ सेवा दिली. त्यानंतर 1971 ते 1981 या काळात ते बीडच्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. याच काळात ‘बौद्ध तत्त्वज्ञानाचा भारताबाहेरील प्रभाव’ या विषयावरील संशोधन प्रबंध सादर करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
1981 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांनी भ्रष्ट आणि ढिसाळ प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या दबावालाही न जुमानता त्यांनी विद्यापीठातील अनेक गैरप्रकार मोडीत काढले. मात्र नैतिकतेच्या कसोटीवर तडजोड न करणार्या डॉ. पाटोदेकरांच्या शिस्तीचा बडगा तेव्हाच्या प्रशासनातील वजनदार असामींना सहन झाला नाही. खोट्या आरोपांमुळे 1989 मध्ये डॉ. पाटोदेकर यांना कुलसचिव पदावरून पायउतार व्हावे लागले. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर 2000 साली त्यांना न्याय मिळाला, मात्र ते पुन्हा विद्यापीठात रुजू होऊ शकले नाहीत. अगोदर लोकप्रभा साप्ताहिकात आणि नंतर दैनिक ‘सामना’तील ‘सच्चाई’ या स्तंभातून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी डॉ. पाटोदेकर यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती.
मराठवाड्याच्या साहित्य चळवळीशी त्यांचा अखेरपर्यंत संबंध राहिला. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांत त्यांनी लिखाण केले. ‘अनुबंध’ हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कुंदा, सारंग आणि अॅड. मनीष ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.